'इकडून तिकडून नाही, थेट बारामतीहून आशीर्वाद आलाय; भर कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी वाचली चिठ्ठी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 12:42 PM2023-06-23T12:42:48+5:302023-06-23T12:45:45+5:30
काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातारा जिल्हा दौऱ्यावर होते.
मुंबई- गेल्या काही दिवसापासून राज्यातील राजकारणात आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातारा जिल्हा दौऱ्यावर होते, यावेळी एका कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना बारामतीहून आलेल्या एका चिठ्ठीवरुन अप्रत्यक्ष टोला लगावला. यावेळी कार्यक्रमात एकच हशा पिकला.
लाखो वारकऱ्यांना दिलासा; आषाढी वारीतील सहभागी वारकऱ्यांना आता शासनातर्फे विमा संरक्षण
काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात एका पोलिस ठाण्याच्या भूमीपूजन सोहळ्यासाठी आले होते. यावेळी त्यांना व्यासपीठावर भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी एक चिठ्ठी आली. ती चिठ्ठी त्यांनी भाषणात वाचून दाखवली, ही चिठ्ठी एका वारकऱ्यांनी पोलीस अधिक्षकांना दिली होती. ही चिठ्ठी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली. या चिट्ठीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचे आभार मानण्यात आले होते. वारकऱ्यांसाठी विमा योजना जाहीर केल्याबद्दल वारकऱ्यांच्या वतीने सरकारचे आभार मानले होते. यात खाली ह.भ.प.इंद्रसेन आटोळे, बारामती असं लिहिण्यात आले होते. या चिठ्ठीचे वाचन करताना उपमुख्यमंत्री फडणवीसांनी ही चिठ्ठी बारामतीहून आली असल्याचे सांगितले. 'थेट बारामतीहून आर्शीवाद आला आहे, इकडून तिकडून आलेला नाही, असं म्हणताच एकच हशा पिकला.
आषाढी वारीतील सहभागी वारकऱ्यांना आता शासनातर्फे विमा संरक्षण
पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण असून लाखो वारकऱ्यांना शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार असल्याची माहिती पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने लोकमत शी बोलताना दिली.
वारी कालावधीत एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांस ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल. दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास १ लाख रुपये देण्यात येतील. अंशत: अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये तसेच वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी ३५ हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळेल. याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबविण्यात येणार आहे.