रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक; प.रे.च्या प्रवाशांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2019 04:08 AM2019-06-01T04:08:55+5:302019-06-01T06:12:44+5:30
मध्य रेल्वे मार्गावर कल्याण ते ठाणे दरम्यान सीएसएमटी दिशेकडील धिम्या मार्गावर रविवारी सकाळी १० वाजून ४८ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ५१ मिनिटांपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुंबई : या आठवड्यात मध्य रेल्वेचा सततचा ‘लेटमार्क’ आणि घामाच्या धारांमुळे कंटाळलेला प्रवासी रविवारी पुन्हा एकदा रेल्वे प्रशासनावर वैतागणार आहे. रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे. पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मात्र रविवारी ब्लॉकपासून दिलासा मिळणार आहे. या मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेऊन डागडुजीचे काम उरकले जाईल.
मध्य रेल्वे मार्गावर कल्याण ते ठाणे दरम्यान सीएसएमटी दिशेकडील धिम्या मार्गावर रविवारी सकाळी १० वाजून ४८ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ५१ मिनिटांपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे कल्याणहून सीएसएमटी दिशेकडील सुटणाऱ्या लोकल सेवेत बदल करण्यात येणार आहे. कल्याण ते मुलुंड या दरम्यान लोकल जलद मार्गावर चालविण्यात येणार आहे. धिम्या मार्गावरील लोकल सेवा ब्लॉक दरम्यान ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा या स्थानकांवर उपलब्ध नसेल.
सकाळी १० वाजून ५ मिनिटांपासून ते दुपारी २ वाजून ५४ मिनिटांपर्यंत सीएसएमटीहून सुटणारी जलद मार्गावरील लोकल संबंधित थांब्यासह घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकावर थांबेल. सकाळी ११ वाजून ४० मिनिटांपासून ते ४ वाजून १० मिनिटांपर्यंत हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे लोकल रद्द करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजून १० मिनिटांपासून ते ३ वाजून ४० मिनिटांपर्यंत चुनाभट्टी, वांद्रे ते सीएसएमटी लोकल रद्द करण्यात येणार आहेत. सकाळी ११ वाजून ३४ मिनिटांपासून ते ४ वाजून २३ मिनिटांपर्यंत सीएसएमटी ते वाशी, बेलापूर, पनवेल लोकल रद्द करण्यात येणार आहेत.
सकाळी ११ वाजून ३४ मिनिटांपासून ते ४ वाजून २३ मिनिटांपर्यंत सीएसएमटी ते वांद्रे, गोरेगाव लोकल रद्द करण्यात येणार आहेत. सकाळी ११ वाजून ३४ मिनिटांपासून ते ४ वाजून २३ मिनिटांपर्यंत वाशी, बेलापूर, पनवेल ते सीएसएमटी लोकल रद्द करण्यात येणार आहेत. सकाळी ११ वाजून ३४ मिनिटांपासून ते ४ वाजून २३ मिनिटांपर्यंत गोरेगाव, वांद्रे ते सीएसएमटी लोकल रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक दरम्यान पनवेल-कुर्ला फलाट क्रमांक ८ वरून विशेष लोकल सेवा चालविण्यात येतील.
जम्बो ब्लॉक
पश्चिम रेल्वे मार्गावर १ जूनच्या मध्यरात्री वसई रोड ते वैतरणा स्थानकापर्यंत जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. चर्चगेट दिशेकडील जलद मार्गावर १ जूनच्या रात्री ११ वाजून ५० मिनिटांपासून ते २ जूनच्या मध्यरात्री २ वाजून ५० मिनिटांपर्यंत ३ तासांचा हा ब्लॉक असेल. २ जूनच्या मध्यरात्री १ वाजून ३० मिनिटांपासून ते पहाटे ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत ३ तास विरार दिशेकडील जलद मार्गावर रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान दोन्ही दिशेकडील सर्व मेल, एक्स्प्रेस १५ मिनिटे उशिराने धावतील. यासह ६९१४९ मेमू गाडी पहाटे चारच्या सुमारास निघण्याऐवजी ४० मिनिटांनी उशिराने चालविण्यात येईल.