ब्लॉकने वाढवली प्रवाशांची डोकेदुखी
By admin | Published: May 26, 2014 04:01 AM2014-05-26T04:01:54+5:302014-05-26T04:01:54+5:30
मध्य रेल्वेच्या मेन लाइन आणि हार्बरवर असलेल्या ब्लॉकने प्रवाशांची डोकेदुखी वाढवली. आधीच उन्हाने हैराण झालेले प्रवासी त्यामुळे जास्तच त्रस्त झाले
मुंबई : मध्य रेल्वेच्या मेन लाइन आणि हार्बरवर असलेल्या ब्लॉकने प्रवाशांची डोकेदुखी वाढवली. आधीच उन्हाने हैराण झालेले प्रवासी त्यामुळे जास्तच त्रस्त झाले. मेन लाइनवर अप धीम्या मार्गावर आणि हार्बरच्या दोन्ही मार्गांवर असलेल्या ब्लॉकमुळे प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. पश्चिम रेल्वेमार्गावर ब्लॉक न घेतल्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना मात्र दिलासा मिळाला. मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर विद्याविहार ते भायखळादरम्यान अप धीम्या मार्गावर सकाळी सव्वा अकरा ते दुपारी सव्वा तीन वाजेपर्यंत ब्लॉक घेतला होता. त्यामुळे या दोन स्थानकांदरम्यानच्या अप धीम्या लोकल अप जलद मार्गावर वळवल्या. या दोन्ही स्थानकांदरम्यानच्या अप जलद मार्गावरील कुर्ला, सायन, माटुंगा, दादर आणि परेल स्थानकावर थांबा देण्यात येत होता. त्यानंतर पुन्हा लोकल अप धीम्या मार्गावर वळवण्यात येत होत्या. मात्र अप धीम्या मार्गावरील विद्याविहार, करी रोड, चिंचपोकळी स्थानकावर लोकलना थांबा देण्यात येत नव्हता. त्यामुळे या मार्गावर उतरणार्या प्रवाशांना त्यापुढच्या स्थानकांवर उतरून मागे यावे लागत होते. या कसरतीत प्रवाशांची दमछाक उडत होती. डाऊन जलद मार्गावरील लोकल गाड्यांना घाटकोपरबरोबरच विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबा दिला जात होता. त्याचप्रमाणे पनवेल ते नेरूळ अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी पावणे अकरा ते दुपारी साडे तीन वाजेपर्यंत ब्लॉक घेतला. पनवेल ते नेरूळ दरम्यानच्या लोकल गाड्या रद्द केल्या होत्या. तसेच ठाणे ते पनवेल या ट्रान्स हार्बरवरीलही लोकल रद्द करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला होता. या ब्लॉकमुळे हार्बर आणि ट्रान्स हार्बरवरील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.(प्रतिनिधी)