मुंबई : मेन लाइनवर कल्याण-ठाणे, कुर्ला-सीएसटी, वडाळा रोड ते माहीम, माहीम-अंधेरी या मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर कल्याण ते ठाणे अप धीम्या मार्गावर सकाळी पावणे अकरा ते दुपारी सव्वा तीन वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे या मार्गावरील लोकल अप जलद मार्गावर वळविण्यात आल्या. अप धीम्या मार्गावरील ठाकुर्ली, कोपर, दिवा, मुंब्रा, कळवा स्थानकांवर लोकल गाड्यांना थांबा देण्यात येत नव्हता. त्यामुळे प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत होती. या मार्गावरील प्रवाशांना जलद मार्गावरून प्रवास करून पुन्हा डाऊन दिशेला येणारी लोकल पकडावी लागत होती. त्याचा फटका महिला, वृद्ध व प्रवाशांना बसत होता. सीएसटीवरून डाऊन दिशेला जाणाऱ्या जलद लोकलला घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांत थांबा देण्यात येत असल्याने थोडाफार दिलासा प्रवाशांना मिळत होता. ब्लॉकमुळे या मार्गावरील लोकल १५ मिनिटे उशिराने धावत होत्या. ब्लॉकचा सर्वाधिक फटका हा हार्बर मार्गावरील प्रवाशांना बसला. कुर्ला-सीएसटी, वडाळा रोड-माहीम, माहीम-अंधेरी या मार्गांवर ब्लॉक घेण्यात आला. सकाळी ११ ते सायंकाळी ४पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आल्यामुळे हार्बर मार्गावर लोकल सेवेचा चांगलाच बोऱ्या वाजला. सीएसटीहून वांद्रे, अंधेरीसाठी सुटणाऱ्या लोकल रद्दच करण्यात आल्या होत्या. तर हार्बरवरील कुर्लाहून सीएसटीला जाणाऱ्या लोकल कुर्ला ते सीएसटीदरम्यान मेन लाइनवरून चालविण्यात येत होत्या. त्यादरम्यान सायन, माटुंगा, दादर, परेल या स्थानकांत लोकलला प्रवाशांच्या सोयीसाठी थांबा देण्यात येत होता. मेन लाइन आणि हार्बरवासीयांची गैरसोय होऊ नये म्हणून घाटकोपर स्थानकातून हुतात्मा चौक, एलबीएस मार्गे डॉकयार्ड रोड आणि शिवाजीनगर, डॉ. एस.पी. मुखर्जी चौक व्हाया ईस्टर्न एक्स्प्रेस हाय-वे ते डॉकयार्डपर्यंत जादा बेस्ट बसही चालविण्यात आल्या.