रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज ब्लॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2019 11:55 PM2019-11-09T23:55:48+5:302019-11-10T09:13:06+5:30
रेल्वे मार्गाची दुरुस्ती, ओव्हरहेड वायरची दुरुस्ती यासाठी मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येईल.
मुंबई : रेल्वे मार्गाची दुरुस्ती, ओव्हरहेड वायरची दुरुस्ती यासाठी मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येईल. मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान तसेच सांताक्रुझ ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक असेल. मध्य रेल्वे मार्गावरील मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान सीएसएमटी दिशेकडील जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल. रविवारी सकाळी ११.३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. मुलुंड ते माटुंगा दरम्यान सीएसएमटी दिशेकडील जलद मार्गावरील लोकल धिम्या मार्गावर चालविण्यात येतील.
हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान दोन्ही दिशेकडे जाणाऱ्या लोकल सकाळी ११.३० ते दुपारी ४ पर्यंत रद्द करण्यात येतील. सकाळी ११.०६ ते दुपारी ४.०१ पर्यंत पनवेल/बेलापूर ते सीएसएमटी लोकल तर सकाळी १०.०३ ते दुपारी ३.१६ पर्यंत सीएसएमटी ते बेलापूर/पनवेल लोकल रद्द करण्यात येतील.
सकाळी १०.१२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर ते ठाणे लोकल तसेच सकाळी ११.४५ ते दुपारी २.४५ वाजेपर्यंत ठाणे ते पनवेल लोकल रद्द करण्यात येतील. सकाळी ११.४५ ते दुपारी २.४५ वाजेपर्यंत नेरूळ ते खारकोपरदरम्यान तसेच दुपारी १२.१५ ते दुपारी ३.१५ वाजेपर्यंत खारकोपर ते नेरुळदरम्यान एकही लोकल धावणार नाही.
पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान रविवारी जम्बो ब्लॉक घेण्यात येईल.
ठाणे-वाशी/नेरुळ लोकल सेवा सुरू
रविवारी सकाळी ११.३० ते दुपारी ४ पर्यंत पनवेल ते अंधेरी लोकल सेवा रद्द करण्यात येईल. प्रवाशांच्या सोयीसाठी ब्लॉक दरम्यान ठाणे-वाशी/नेरुळ मार्गावर लोकल सेवा सुरू असेल.
सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष सेवा चालविण्यात येईल. दादर ते रत्नागिरी पॅसेंजर एक्स्प्रेस रत्नागिरीहून येताना दिवा स्थानकापर्यंत चालविण्यात येईल. त्यानंतर दिवा स्थानकातून ही एक्स्प्रेस रत्नागिरीकडे रवाना होईल.