लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार, मुंबईतही नाईट कर्फ्यू लागू झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून ठिकठिकाणी रात्री नाकाबंदी करत कारवाई करण्यात येत आहे.
पाचहून अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी आहे. रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत ही जमावबंदी लागू आहे. २७ मार्चच्या मध्यरात्रीपासून लागू करण्यात आलेले हे निर्बंध १५ एप्रिलपर्यंत लागू असणार आहेत. मुंबई पोलिसांकडून अनेक ठिकाणी रात्री नाकाबंदी करण्यात आली आहे. रात्री विनाकारण फिरणाऱ्यांवर तसेच रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे तसेच विनाकारण बाहेर फिरणाऱ्या लोकांना घरी परतण्याचे आवाहन पोलिसांकड़ून करण्यात येत आहे.
नागरिकांनी नियमांचे पालन करावे यासाठी मुंबई पोलिसांच्या ट्वीटर हँडलवरूनही जनजागृती करण्यात येत आहे. त्यात सर्व ‘अत्यावश्यक सेवा’ सुरू राहतील. सार्वजनिक ठिकाणे बंद राहतील. होम डिलिव्हरी व टेक अवे सुविधा सुरू राहणार आहेत. मुंबईकरांनो, कृपया सहकार्य करा, सुरक्षित रहा’ असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.