लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : देशातील पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने केल्या आहेत. विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या पाच राज्यांपैकी तीन राज्य ही महाराष्ट्राच्या सीमेलगतची राज्य आहेत.
यात मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि तेलंगणा या राज्यांचा समावेश आहे, तर राजस्थानही महाराष्ट्रापासून जवळ आहे. महाराष्ट्रातून या राज्यांमध्ये अवैध दारू आणि पेैशांची वाहतूक होऊ शकते, असा संशय केंद्रीय निवडणूक आयोगाला आहे. यासाठीच महाराष्ट्रालगतच्या मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि तेलंगणा या राज्यांच्या सीमेवर तपासणी नाके सुरू करण्याच्या सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने केल्या आहेत.
मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि तेलंगणा या तीन राज्यांच्या सीमेवर तपासणी नाके सुरू करण्याबाबत राज्य उत्पादन शुल्क, व्यावसायिक कर आणि मुख्य वनसंरक्षकांना राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी निर्देश दिले आहेत. त्यानुसार या तीनही विभागांनी धुळे, जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड जिल्हाधिकाऱ्यांना राज्याच्या सीमेवर तपासणी नाके उभारण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
जप्त झाल्यास काय?
या तपासणी नाक्यांवर होणाऱ्या कारवाईचा तसेच जप्त केलेल्या रोकड, किमती वस्तू, अवैध दारू याबाबतचा अहवाल दर सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर करावा, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.