झेड ब्रिज बंद असल्याने प्रवाशांची ‘नाकाबंदी’; दुरुस्तीचे काम रखडले, प्रवाशांची पायपीट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 11:00 AM2024-03-06T11:00:12+5:302024-03-06T11:01:47+5:30
मध्य रेल्वेचे माटुंगा स्थानक आणि पश्चिम रेल्वेचे माटुंगा रोड रेल्वे स्थानक या दोन स्थानकांना जोडणाऱ्या झेड ब्रिजच्या दुरुस्तीचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही.
मुंबई : मध्य रेल्वेचे माटुंगा स्थानक आणि पश्चिम रेल्वेचे माटुंगा रोड रेल्वे स्थानक या दोन स्थानकांना जोडणाऱ्या झेड ब्रिजच्या दुरुस्तीचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. दोन महिन्यांपूर्वी बंद करण्यात आलेल्या ब्रिजचे निम्मे काम पूर्ण होणे अपेक्षित असताना याकामी फारशी काही प्रगती झालेली नाही. दुसरीकडे हा झेड ब्रिज बंद केल्याने पूर्व-पश्चिम असा प्रवास करताना रेल्वेच्या प्रवाशांना मोठी पायपीट करावी लागत आहे.
मध्य रेल्वेहून पश्चिम रेल्वे गाठताना झेड ब्रिज हा पादचाऱ्यांसाठी सोयीस्कर असून, यामुळे त्यांची मोठी पायपीट वाचत होती. मात्र, आता दोन्ही मार्गावरील प्रवाशांना हा ब्रिज बंद असल्याने दादरला येऊनच पुढील मार्ग निवडावा लागत आहे. या ब्रिजमुळे दोन्ही मार्गावरील रेल्वे स्थानकांवरच्या प्रवाशांना झेड ब्रिज मार्गे माटुंगा रोड, माटुंगा रेल्वे स्थानक गाठता येत होते. ब्रिज बंद असल्याने मध्य रेल्वेच्या प्रवाशांना माटुंगा रेल्वे स्थानकावर उतरत धारावीतून माटुंगा रोड रेल्वे स्थानकाचा परिसर गाठावा लागत आहे. ही पायपीट मोठी असल्याने प्रवाशांचा यात मोठा वेळ जातो.
दोन महिन्यांत पुलाचे काही तरी काम होणे अपेक्षित होते. मात्र, दोन महिने उलटले तरी पुलाची दुरुस्ती झालेली नाही. प्रवाशांच्या सोयीसाठी असलेली कामे वेळेत पूर्ण होत नसतील तर प्रवाशांना सातत्याने अशीच पायपीट करावी लागणार आहे - हरीष मुणे, रेल्वे प्रवासी
मध्य रेल्वेकडून प्रतिसाद नाही :
१) झेड ब्रिज कधी पूर्ण होणार किंवा या कामाची माहिती पश्चिम रेल्वेला विचारली असता हे काम मध्य रेल्वेकडे असल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.
२) तर मध्य रेल्वेला याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद प्राप्त झाला नाही.
३) माटुंगा पूर्व आणि पश्चिम परिसरात मोठ्या प्रमाणावर महाविद्यालये आहेत. विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर या ब्रिजचा वापर करत होते. मात्र, ब्रिज बंद असल्याने त्यांनाही वळसे घालावे लागत आहे.