छोट्या विकासकांची नाकाबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:19 AM2020-12-04T04:19:04+5:302020-12-04T04:19:04+5:30
पाच वर्षांत नामांकित विकासकांच्या गृहप्रकल्पात वाढ लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : २०१५मध्ये मुंबई महानगर क्षेत्रातील नामांकित (ब्रँडेड) विकासकांचे ४० ...
पाच वर्षांत नामांकित विकासकांच्या गृहप्रकल्पात वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : २०१५मध्ये मुंबई महानगर क्षेत्रातील नामांकित (ब्रँडेड) विकासकांचे ४० टक्के, तर विकासकांचे ६० टक्के प्रकल्प होते. गेल्या पाच वर्षांत त्यात मोठ्या प्रमाणात बदल झाला असून सध्या नामांकित विकासकांच्या प्रकल्पांची संख्या ५५ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. मुंबईपेक्षाही बंगळूरु आणि चेन्नई या शहरांतील गुंतवणूकदार नामांकित विकासकांना जास्त प्राधान्य देत असून तिथे या प्रकल्पांचा टक्का जवळपास ६३ आहे. राज्यातील सात प्रमुख शहरांमध्ये हा टक्का ४१वरून ५३ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
ॲनरॉक प्राॅपर्टी या नामांकित सल्लागार संस्थेने केलेल्या सर्वेक्षण अहवालातून ही माहिती हाती आली आहे. २०१५मध्ये ३ लाख ९० हजार घरांपैकी २ लाख ३० हजार घरे ही छोट्या विकासकांची होती. २०१९मध्ये जवळपास २ लाख ३७ हजार नव्या घरांचे बांधकाम सुरू झाले होते. त्यापैकी १ लाख ३५ हजार घरेही नामांकित विकासकांची होती, असेही या अहवालात नमूद केले आहे. कोरोना संक्रमणामुळे यंदा नव्या घरांच्या उभारणीची संख्या प्रचंड रोडावली आहे. सप्टेंबर अखेरीपर्यंत ७५ हजार १४० घरांची उभारणी झाली असून, त्यात ५३ टक्के ४० हजार घरेही नामांकित विकासकांच्या प्रकल्पांतील आहे. गेल्या काही वर्षांपासून विश्वासार्ह गृहप्रकल्पात गुंतवणूक करण्याकडे ग्राहकांचा ओढा वाढला आहे. मागणी तसा पुरवठा या तत्त्वामुळे नामांकित प्रकल्पांतील घरांची मागणी वाढली असल्याचे मत ॲनरॉकचे चेअरमन अनुज पुरी यांनी व्यक्त केले आहे.
गेल्या काही वर्षांत या क्षेत्रात मोठी मंदी आली आहे. नोटबंदी, रेरा, जीएसटी यामुळे या व्यवसायाचे गणित व्यस्त झाले आहे. अनेक छोट्या विकासकांची आर्थिक कोंडी झाली आहे. अनेकांना वित्तीय साहाय्य मिळविणे अवघड जात असल्याने त्यांच्या प्रकल्पांची रखडपट्टी सुरू आहे. त्यात कोरोनाचे संकट गहिरे झाल्यानंतर त्यांना या व्यवसायाला रामराम ठोकत असल्याचे चित्र सध्या आहे.