मुंबई: राज्यात ठिकठिकाणी मराठा आरक्षण आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणामुळे मंगळवारी राज्यातील एसटीच्या ६४ पेक्षा जास्त आगारातील वाहतुक ठप्प आहे. तर काही जिल्ह्यातील आगारातील वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. गेल्या काही दिवसात १०० पेक्षा जास्त एसटीची तोडफोड झाली आहे. तर एसटीचे दहा कोटींहून अधिक नुकसान झाले आहे.
एसटी महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले कि, स्थानिक पोलीस प्रशासनाने दिलेल्या सुचनेनुसार खबरदारीचा उपाय म्हणून मराठवाड्यातील परभणी, धाराशीव, लातूर, जालना, नांदेड, बीड,छ.संभाजीनगर या जिल्ह्यातील सर्व एसटी वाहतूक बंद आहे. सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील वाहतूक अंशतः बंद आहे. तसेच इतर जिल्ह्यातील मराठवाड्याकडे जाणारी एसटी वाहतूक बंद करण्यात आली आहे. या जिल्ह्यातील ६४ आगाराची वाहतूक पुर्णतः बंद आहे. त्यामुळे १६ हजार ७०० पेक्षा जास्त बस फेऱ्या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत.
गेल्या काही दिवसात १०० पेक्षा जास्त एसटी बसेस ची मोडतोड करण्यात आली आहे. तर ४ एसटी बसेस ची जाळपोळ केली आहे.एसटी बसेस ची मोडतोड, जाळपोळ झाल्याने अंदाजे ५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या विगातील वाहतूक पुर्णतः, अथवा अंशतः बंद असल्याने दररोज एसटीचा ५-५.५कोटी रुपयांचा तिकीट महसूल बुडत आहे.