मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ब्लॉगर्सची संख्या वाढत असून त्यात डोंगर-दऱ्यांमधून फिरणारे गिर्यारोहकही ब्लॉग्स लिहिण्यात मागे नाहीत. याच ब्लॉगर्सचा विचार करून यंदाच्या मुलुंड येथील १४ व्या गिरिमित्र संमेलनात ब्लॉगर्सना व्यासपीठ दिले जाणार आहे. आता यापैकी सर्वोत्कृष्ट ब्लॉगरला पारितोषिक दिले जाणार आहे.यंदाच्या संमेलनात पदभ्रमंती, गिरिभ्रमंती, दुर्गभ्रमंती, प्रस्तरारोहण, हिमालयीन मोहिमा या विषयांवरील ब्लॉगर्सची स्पर्धा घेण्यात येत आहे. तसेच पोस्टर स्पर्धाही नव्याने सुरू करण्यात आली आहे. सह्याद्रीतल्या भटकंती करताना आढळणाऱ्या शिल्पकलेवर आधारित पोस्टर्स यासाठी पाठविता येतील. वैभवशाली गडकिल्ल्यांचा सांभाळ कसा करायचा, याचे मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने दुर्गसंवर्धन ही १४ व्या गिरिमित्र संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना ठेवण्यात आली आहे. ‘दुर्गसंवर्धन’ संकल्पनेला अनुसरून संमेलनात अनेक व्याख्याने, परिसंवाद, खुली चर्चा, प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनात पुरातत्त्व क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे, संमेलनस्थळी उपस्थित असणाऱ्या केंद्र आणि राज्य पुरातत्त्व खात्याच्या संचालकांशी खुला संवाद साधता येईल. (प्रतिनिधी)
ब्लॉगर्सनाही आता गिरिमित्र संमेलनात व्यासपीठ!
By admin | Published: June 28, 2015 12:59 AM