मुंबई : कोरोना विषाणूमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनदरम्यान अनेक रुग्णालयांना रक्ताच्या कमतरतेची अडचण भेडसावत आहे. ही अडचण सोडवण्यासाठी विलेपार्लेच्या एम. एल. डहाणूकर कॉलेजने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांसह नागरिकांचा सहभाग लाभलेल्या या शिबिरातून एकूण ५० युनिट रक्त गोळा करण्यात यश आले.
डहाणूकर कॉलेजच्या एनएसएस विभागाच्या वतीने आणि नायर रुग्णालयाच्या सहकार्याने शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या या शिबीरामध्ये कॉलेजच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्थानिक नागरिकांनीही यावेळी रक्तदान करुन मोलाचे योगदान दिले. कॉलेजचे प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर डोके, प्रा. नारायण पगार आणि माजी विद्यार्थी व एनएसएस स्वयंसेवक चेतन काते यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर यशस्वी झाले.
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबीरात सरकारने दिलेल्या निर्देशांचेही कठोर पालन करण्यात आले. यावेळी प्रत्येक व्यक्तीमध्ये सामाजिक अंतर ठेवतानाच, वेळोवेळी सॅनिटायझरद्वारे स्वच्छाताही करण्यात आली. आरोग्य कर्मचा-यांनीही पीपीई किटचा वापर करत आपली जबाबदारी पार पाडली. याशिवाय प्रत्येक रक्तदात्याने आणि स्वयंसेवकाने मास्क व ग्लोव्ह्जचा वापर करत पूर्ण काळजी घेतली.