वर्सोव्यात रात्री उशिरापर्यंत रक्तदान शिबीर, मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 03:24 PM2021-04-25T15:24:39+5:302021-04-25T15:25:24+5:30

Blood donation camp : सध्या मुंबईत ठिकठिकाणी रक्तदान शिबीरांचे आयोजन साधारणपणे सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत केले जात आहेत.

Blood donation camp in Versova late at night, responding to CM's call | वर्सोव्यात रात्री उशिरापर्यंत रक्तदान शिबीर, मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद

वर्सोव्यात रात्री उशिरापर्यंत रक्तदान शिबीर, मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद

googlenewsNext

- मनोहर कुंभेजकर

मुंबई - कोरोना संकट काळात महाराष्ट्रात जाणवणाऱ्या रक्त टंचाईवर मात करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत वर्सोवा, यारी रोड प्रभाग क्रमांक 59 च्या युवा अल्पसंख्याक समाजाची मोलाची साथ मिळाली. सध्या सुरू असलेल्या रमझानच्या पवित्र महिन्यात अल्पसंख्याक बांधवांसह समाजातील महिलांनीही उस्फूर्त सहभाग घेतला आणि मध्यरात्रीपर्यंत रक्तदान शिबीर आयोजित करून एक आदर्श ठेवला. यावेळी बाळासाहेब ठाकरे ब्लड बँकेच्या पथकाने २०७ युनिट रक्त संकलन केले.

सध्या मुंबईत ठिकठिकाणी रक्तदान शिबीरांचे आयोजन साधारणपणे सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत केले जात आहेत. मात्र येथील युवा अल्पसंख्याक समाजाने क्लाराज कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य अजय कौल  यांच्या मार्गदर्शनाखाली यारी रोड वर्सोवा अल्पसंख्याक समाजाच्यावतीने रोझा सोडल्यानंतर प्रथमच काल (दि.24) रात्री उशिरापर्यंत रक्तदान शिबीर आयोजित केले. मुंबईसह राज्यातील अशा प्रकारे मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या रक्तदान शिबीराची पहिलीच घटना आहे, अशी माहिती पालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष व वर्सोवा विधानसभा संघटक यशोधर फणसे यांनी 'लोकमत'ला दिली.

परिवहनमंत्री व विभागप्रमुख अनिल परब यांनी रात्रीच्या वेळेस रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचे तसेच यारी रोड वर्सोवा अल्पसंख्याक समाजाचे व प्राचार्य अजय कौल यांचे मनापासून आभार मानले. रक्तदानाच्या दिशेने तरुणांचा विशेष सहभाग होता. युवाशक्ती हा देशाचा विजय आहे आणि अशी उदात्त कामे करून या तरुणांनी समाजाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या तरुणांनी समाजाला नवी दिशा दिली आहे, हे एक स्तुत्य पाऊल आहे, असे यावेळी अनिल परब म्हणाले. 

यावेळी यशोधर फणसे, पालिकेच्या आरोग्य समिती अध्यक्षा राजूल पटेल, बाजार उद्यान समिती अध्यक्षा व स्थानिक नगरसेविका प्रतिमा खोपडे, वर्सोव्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सिराज इनामदार, उपविभागप्रमुख प्रसाद आयरे, विना टॉक, शाखाप्रमुख सतिश परब, दयानंद सावंत, उदय महाले, बेबी पाटील,क्लाराज कॉलेज ऑफ कॉमर्सचे ऍक्टिव्हिटी चेअरमन प्रशांत काशीद तसेच शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. उपशाखाप्रमुख तारीक पटेल, फैजल कश्मिरी,इक्बाल फर्निचरवाला, एजाज विराणी, अनिस जलनावी, सय्यद आलम, गटप्रमुख सलिम शेख, प्रशांत मुरावाला  यांच्यासह अनेक मुस्लिम समाजातील बांधवांनी प्रथमच रात्रीचे रक्तदान शिबीर आयोजन करण्याचा धाडसी प्रयत्न यशस्वी केला.

क्लाराज कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य अजय कौल आणि शिवसेना शाखा क्रमांक 59 तर्फे अलीकडेच रक्तदान शिबीर दिवसा आयोजित केले होते. मात्र रमझान मुळे आम्ही यावेळी सहभागी झालो नाही.त्यामुळे आमच्यासाठी येथे रात्री रक्तदान शिबीर आयोजित करावे अशी विनंती वर्सोवा अल्पसंख्याक समाजाने प्राचार्य अजय कौल यांना विनंती केली आणि येथे मध्यरात्रीपर्यंत रक्तदान शिबीर यशस्वीपणे आयोजित केले, अशी माहिती या संस्थेच्यापदाधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: Blood donation camp in Versova late at night, responding to CM's call

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.