मुंबई : ‘रक्ताचं नातं’ या लोकमत समूहाच्या उपक्रमांतर्गत दादर पूर्व येथील संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्ट/ संत निरंकारी सत्संग भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात ९० दात्यांनी रक्तदान केले. या रक्तदात्यांमध्ये तरुणांचा सहभाग लक्षणीय होता.
स्वातंत्र्यसंग्राम सेनानी व लोकमत समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. दादर पूर्व येथील शिबिराचे उद्घाटन संत निरंकारी मंडळ, घाटकोपर विभाग, सेक्टर संयोजक प्रकाश जोशी यांच्या हस्ते झाले. सकाळी ९ ते दुपारी १ यावेळेत झालेल्या या शिबिराचे नियोजन करण्यासाठी निरंकारी मंडळाचे ५० स्वयंसेवक उपस्थित होते. शिवडी, काळाचौकी, घोडपदेव, माझगाव येथील अनुयायांनी रक्तदान केले.
कोट :
रक्तदान हे महान कार्य आहे. त्यात सर्वांनी सहभागी व्हायला हवे. तरुणांनी यात पुढाकार घ्यायला हवा. लोकमत राबवत असलेल्या या उपक्रमामुळे अनेकांना प्रेरणा मिळेल.
- केशव पवार, सत्संग प्रमुख, शिवडी, काळाचौकी, घोडपदेव विभाग
संत निरंकारी मंडळाची स्वतःची रक्तपेढी आहे. १९८६पासून आम्ही रक्तदान शिबिरांचे आयोजन करतो आहोत. ‘लोकमत’चा उपक्रम जनजागृती करणारा आहे. कोरोना काळात रक्ताची गरज आहे. लोकमत घराघरात पोहोचला आहे. त्या माध्यमातून अनेक रक्तदाते तयार होतील.
- मारूती कासारे, रक्तपेढी व्यवस्थापक
मी आतापर्यंत २८वेळा रक्तदान केले आहे. रक्तदान ही काळाची गरज आहे. मानवतेसाठी प्रत्येकाने रक्तदान करायला हवे.
- राकेश उदेग, रक्तदाता
प्रत्येकाने रक्तदान करायला हवे. ‘लोकमत’चा उपक्रम कौतुकास्पद आहे. - संदीप महाडिक, रक्तदाता
फोटो ओळ
रक्तदाता संदीप महाडिक यांना संत निरंकारी मंडळाचे अनुयायी रमेश बामणे, भाऊसाहेब जाधव, अनिल काडगे, विजय यादव यांनी प्रमाणपत्र दिले.