मुंबई : मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरांचे आयोजन करुन विविध प्रकारच्या रुग्णांसाठी रक्त उपलब्ध करणारे विक्रम प्रस्थापित करणारे रक्तदान प्रणेते श्रीधर देवलकर यांना ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र जनजागृती ऑनलाईन काव्य स्पर्धा सन्मान प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विजय वैद्य आणि योगेश त्रिवेदी यांच्या हस्ते बोरीवली ( पूर्व ) येथील मागाठाणे मित्र मंडळ संचालित कै. प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालय सभागृहात स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येऊन सन्मानित करण्यात आले.
ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र यांच्या सातव्या वर्धापन दिना निमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन स्वरचित रक्तदान स्पर्धा 'रक्तदानावर लिहू या काही' या विषयावर रक्तदान जनजागृती काव्य स्पर्धेत कामगार राज्य विमा योजना रुग्णालय कांदिवली (पूर्व) मुंबई येथील सेवा निवृत्त परंतू आजही या पवित्र कार्यात पूर्णवेळ कार्यरत असलेले रक्तपेढी विभाग तंत्रज्ञ श्रीधर देवलकर यांनी आपल्या शासकीय रक्तपेढी विभागातील सेवेतील अनुभव असल्याने आणि ते स्वतः कवी असल्याने त्यांनी या रक्तदान जनजागृती स्पर्धेत भाग घेतला.
रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आलेले रुग्ण व गरजवंत रुग्णांना विनामूल्य रक्तकुपिंचा पुरवठा करून रुग्णांना जीवनदान मिळण्याकरिता एक छोटासा प्रयत्न करून रुग्णांना आणि त्यांच्या परिवाराच्या आनंदात आत्मिक समाधान मानणारे देवलकर यांनी रक्तदान स्पर्धेत भाग घेताना स्वरचित कवितेतून रक्तदानाचे महत्व सादर केले.
रुग्णसेवेचा त्यांचा वारसा आणि रक्तपेढी विभागातील जनजागृतीचा अनुभव व त्यांची रक्तदान या विषया वरील स्वलिखत कविता ऑनलाईन व्दारे व्यक्त केली.या कवितेची दखल घेऊन त्यांना ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र या संस्थे द्वारे मिळालेले सन्मान चिन्ह, सन्मान पदक, सन्मान पत्र कै. प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालय व मागाठणे मित्र मंडळाचे संस्थापक विजय वैद्य आणि योगेश त्रिवेदी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी ग्रंथालयाच्या संजना वारंग याही उपस्थित होत्या.