मुंबई : आषाढी वारी जवळ आली की वारकऱ्यांना विठुरायाच्या दर्शनाचे वेध लागतात. कोरोनामुळे दोन वर्षे वारी निघाली नसली तरी वारकऱ्यांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. विठ्ठलभक्तीची ऊर्जा रक्तदानाच्या रुपाने लाखो रुग्णांना हस्तांतरित करत वारकऱ्यांनी यंदा अनोखी वारी साजरी केली. दादरच्या विठ्ठल मंदिरात गुरुवारी ‘लोकमत’च्या साथीने हा अनोखा उपक्रम पार पडला. मुंबई डबेवाला संघटना, अखिल भारतीय कीर्तन संस्था आणि ज्ञानदा प्रबोधन संस्थेच्या वारकऱ्यांनी विठू नामाचा जयघोष करत या रक्तदानाच्या वारीत सहभाग घेतला.
‘लोकमत’ने ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त ‘रक्ताचं नातं’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. गुरुवारी दादरच्या विठ्ठल मंदिरात झालेल्या रक्तदान शिबिरात २४ युनिट रक्तसंकलन करण्यात आले. भाजपचे मुंबई सचिव सचिन शिंदे यांचे यासाठी विशेष सहकार्य लाभले. केईएम रुग्णालयाने रक्तपेढी उपलब्ध करून दिली.
रा. स्व. संघाचे कोकण प्रांत कार्यवाह विठ्ठल कांबळे, राष्ट्र सेविका समितीच्या कुंदा फाटक, समर्थ व्यायाम मंदिरचे उदय देशपांडे, मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुके, ज्ञानदा प्रबोधन संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पळ, विहिंपचे विभाग मंत्री प्रसाद संसारे, ज्येष्ठ कीर्तनकार उमाताई तेंडुलकर यांच्या हस्ते विठ्ठल आणि भारतमाच्या प्रतिमेला पुष्पार्पण आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी मोहन सालेकर, बाबुराव बद्रुक, गौरीशंकर पुरोहित, राजेश पवार, मनोज मिसाळ, भारती चंपानेरकर, भक्ती जोगल, अभिषेक शिंदे, संतोष नाईक, संतोष नारायणे, ऋषिकेश शिळीमकर उपस्थित होते.
रक्तदात्यांना पांडुरंगाची प्रतिमा, तुळशीचे रोप आणि ३० किलो जीवनावश्यक वस्तूंचे किट देऊन सन्मानित करण्यात आले. पसायदानाने शिबिराची सांगता झाली.
ज्ञानदा प्रबोधन संस्था दरवर्षी आषाढी एकादशीला वृक्ष दिंडी आयोजित करते. कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन यंदा ‘वारी रक्तदाना’ची या संकल्पनेच्या माध्यमातून ‘लोकमत’च्या रक्तदान महायज्ञात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
- प्रशांत पळ, अध्यक्ष, ज्ञानदा प्रबोधन संस्था
डबेवाल्यांच्या रक्ताचा प्रत्येक थेंब हा समाजकार्यासाठी आहे. कोरोनामुळे आमच्यावर अर्थसंकट ओढावले आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांना आर्थिक मदत करू शकलो नसलो तरी रक्तदान करून आम्ही दायित्व पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे.
- उल्हास मुके, अध्यक्ष, मुंबई डबेवाले संघटना