Join us

रक्ताचं नातं... सतत जपण्याचं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2021 4:04 AM

अजून तरी कृत्रिमरीत्या रक्त तयार करण्याइतपत विज्ञानाने प्रगती केलेली नाही. रक्ताचा खूप साठा असेल तर त्या रक्ताची पावडर करून ...

अजून तरी कृत्रिमरीत्या रक्त तयार करण्याइतपत विज्ञानाने प्रगती केलेली नाही. रक्ताचा खूप साठा असेल तर त्या रक्ताची पावडर करून किंवा अन्य मार्गाने ते दीर्घकाळ साठवूनही ठेवता येत नाही. त्यामुळे रक्तदान हे विशिष्ट काळापुरते करून आपणा सर्वांची जबाबदारी संपत नाही. रक्ताचे हे नाते सातत्याने जपावे लागते. समृद्ध करावे लागते. रक्तदान असा शब्द जरी त्यासाठी वापरला जात असला, तरी त्या दातृत्वात जीवनदानाचे समाधान सामावलेले आहे. ‘लोकमत’ने सध्या सुरू केलेली रक्तदानाची मोहीम त्यामुळेच खूप महत्त्वाची आहे.

.................................

रक्त हे कुठल्याही कारखान्यात तयार करता येत नाही किंवा कृत्रिमरीत्या बनत नाही, हे आपण सर्वजण जाणताेच. त्यामुळे जेव्हा गरज पडेल तेव्हा रक्त उपलब्ध होणे, वेगवेगळ्या गटाचे रक्त गरजेनुसार मिळत राहणे ही वैद्यकीय क्षेत्राची गरज आहे. त्यासाठी रक्तदान हे एकदा करून चालत नाही, तर सातत्याने चालविली जाणारी ती एक चळवळ आहे. सध्याच्या कोरोनाच्या साथीच्या काळात तर या चळवळीची नितांत आवश्यकता आहे.

मुख्यत: शस्त्रक्रिया करताना, प्रसूतीदरम्यान हिमाेग्लाेबीन कमी असल्यास, प्रसूतीपश्चात रक्तस्राव जास्त झाल्यास, अपघातात अतिरक्तस्राव झालेल्या रुग्णांसाठी, तसेच महत्त्वाचे म्हणजे थॅलेसिमिया असलेल्या बालकांना दर १५ ते २१ दिवसांनी रक्त द्यावे लागते. रक्ताच्या कर्करोगादरम्यान काही उपचारांत रक्ताची गरज भासते. ही अत्यावश्यक निकड लक्षात घेता आपण रक्तदान करायला हवे.

कोण रक्तदान करू शकते?

१. १८ वर्षे पूर्ण झालेल्या तरुण-तरुणी वयाच्या ६५ वर्षांपर्यंत.

२. वजन कमीत कमी ५० किलाे असलेले- म्हणजे मुलाचे ४५ किलो, तर मुलीचे किमान ४८ किलो हवे.

३. हिमाेग्लाेबीन म्हणजेच शरीरातील रक्ताचे प्रमाण १२.५ ग्राम टक्क्यांपेक्षा जास्त.

४. कुठलेही आजार नसलेल्या निराेगी व्यक्ती.

५. तीन महिन्यांतून एकदा-वर्षातून ४ वेळा रक्तदान करू शकतात.

रक्ताच्या विविध चाचण्या करून व रक्तगट तपासून ते लागेल तेव्हा गरजू रुग्णाला दिले जाते. विविध आजारांमध्ये संपूर्ण रक्त न देता वेगवेगळे रक्तघटक दिले जातात. जेव्हा संपूर्ण रक्त- ज्याला आपण ‘हाेल ब्लड’ म्हणताे ते रक्तदात्यांकडून घेऊन ते सहा तासांच्या आत रक्तपेढीत किंवा रक्तविलगीकरणात आणून सेंट्री फ्यूज यंत्रामध्ये फिरवून त्यातील वेगवेगळे रक्तघटक वेगळे केले जातात. उदाहरणार्थ - १. पीआरबीसी (Packed Red Blood Cells), २ प्लाझ्मा- (Plasma)- रक्तद्रव्य, ३. Platelets प्लेटलेट्स- रक्तबिंबिका. हे घटक वेगळे करता येतात. हे रक्तघटक वेगवेगळ्या आजारांमध्ये वेगवेगळ्या रुग्णांना दिले जातात. म्हणजेच आपण एका व्यक्तीकडून घेतलेल्या एका रक्तपिशवीचे (सुमारे ३५० मिलिलिटर रक्ताचे) तीन वेगवेगळे रक्तघटक बनवून, तीन वेगवेगळ्या रुग्णांचे प्राण वाचवू शकताे, म्हणूनच सर्व दानामध्ये रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान समजले जाते. त्यामुळेच पुढे या... रक्तदान करा... हे आवाहन खूप महत्त्वाचे ठरते. त्यासाठी प्रयत्न करणारे, नियमित रक्तदान करणारे गौरवास पात्र होतात.

आता रक्ताचा आणखी कशाप्रकारे वापर कसा केला जातो, ते पाहू -

1. अफेरेसिस - या प्रक्रियेमध्ये रक्तातून फक्त प्लेटलेट्स वेगळ्या करून रक्त परत दात्याच्या शरीरात टाकले जाते. यासाठी खास अफेरेसिस यंत्र व कुशल तज्ज्ञांची आवश्यकता असते. सर्वसाधारण रक्तदानासाठी लागणारे सर्व नियम यासाठी लागू होतात. त्यासोबतच प्लेटलेट्स दोन लाखांपेक्षा जास्त असल्यासच प्लेटलेट्स दान करता येतात. त्याला आपण सिंगल डाेनर प्लेटलेट्स (SDP) म्हणताे. जर रक्त गाेळा करून रक्तपेढीत प्लेटलेट वेगळ्या काढल्या, तर त्यांना रँडम डाेनर प्लेटलेट्स (RDP) म्हणतात.

डेंग्यूच्या रुग्णांमध्ये प्लेटलेट्स खूप कमी हाेऊन रक्तस्राव सुरू झाल्यास SDP दिले जातात, तसेच कर्कराेगाच्या रुग्णांसाठी याचा उपयाेग हाेताे. १५ दिवसांतून एकदा म्हणजे वर्षातून २४ वेळा प्लेटलेट्स दान करता येतात.

२. काॅनव्हलसंट प्लाझ्मा : काेविडचे जे रुग्ण बरे होतात, त्यांच्या शरीरात प्रतिपिंडे तयार होतात. समजा, एखाद्या रुग्णाची ऑक्सिजन पातळी खालावली, तर त्याला काेविड रुग्णाचा प्लाझ्मा (जाे आजारातून बरा झाल्यानंतर एका महिन्यानंतर) देता येताे. ही प्रक्रिया सिंगल डाेनर प्लेटलेट्ससारखीच असून, दात्याच्या शरीरातील फक्त प्लाझ्मा काढून उरलेले रक्त परत दात्याच्या शरीरात टाकले जाते. यासाठी अफेरेसिस यंत्राचीच गरज लागते.

आयुष्य

पीआरबीसी : ४२ दिवस, २ ते ८ डीग्री सेल्सियस

एफएफपी : (Fresh Frozen Plasma): १ वर्षे, उणे ४० अंश सेल्सियस

प्लेटलेट्स : ५ दिवस, २२ ते २६ अंश सेल्सियसला साठवले जाते.

रक्ताचा वेळेत वापर गरजेचा!

साठवून ठेवलेले, शिल्लक राहिलेले रक्त ३५ दिवसांनंतर किंवा ४२ दिवसांनंतर तसेच ठेवले तर त्याचा काहीच उपयाेग हाेत नाही. या कालावधीत त्याचा वापर करावा लागतो. विज्ञानाच्या प्रगतीच्या काळात पुढे जाऊन या शिल्लक रक्तावर संशाेधन करून ते उपयाेगात आणले जाऊ शकते; पण अजून तरी त्यावर मार्ग सापडलेला नाही. कधी ना कधी कृत्रिम रक्त बनविण्यास किंवा शिल्लक रक्ताची पावडर करून ते साठवून ठेवण्यात यश प्राप्त हाेईलच. त्यावेळेस रक्ताची गरज आतापेक्षा अधिक सुलभ पद्धतीने भागविता येऊ शकते.

रक्तदानाचे हेही फायदे -

१. तुम्ही जेव्हा नियमितपणे रक्तदान करण्यास जाता तेव्हा तुमच्या शरीरातील रक्ताची पातळी तपासली जाते. शरीराचे तापमान पाहिले जाते, रक्तदाब तपासला जातो. त्यामुळे हृदय किंवा रक्तवाहिन्यांशी संबंधित आजाराची लक्षणे जरी दिसली तरी ती लगेच निदर्शनास येतात. मुळात एकदा रक्तदान केल्यावर शरीरात नव्या रक्ताची निर्मिती सुरू होते. त्याचाही आरोग्याला फायदा होतो.

२. काही वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, नियमित रक्तदान केल्यास हृदयविकाराचा धोका कमी होतो.

३. अमेरिकेसारख्या काही देशांत रक्तक्षय किंवा ॲनिमिया यांच्यासोबतच शरीरात लोहाची पातळी वाढण्याचे आजारही दिसून येतात. रक्तदानामुळे त्यावर आपोआप मात करता येते.

४. नॅशनल सायन्स सेंटरच्या एका जर्नलने केलेल्या संशोधनात रक्तदानामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो, असाही दावा करण्यात आला आहे.

५. एका वेगळ्या संशोधनात रक्तदानामुळे यकृताचे कार्य सुधारत असल्याचा दाखला देण्यात आला आहे.

६. तुम्ही नियमितपणे रक्तदान करीत असाल तर एकप्रकारे तुम्ही आरोग्याच्या चळवळीतील स्वयंसेवक होता. तुमचा जनसंपर्क वाढतो. रक्तदान केल्याचे समाधान, त्यात वेगवेगळ्या लोकांशी होणारा संवाद यामुळे तुमचा मानसिक ताणही कमी होतो. आपण कुणाच्या तरी उपयोगी पडतो आहोत, ही भावनाही जगण्याची नवी उमेद देऊन जाते.

- डाॅ. काशीनाथ जाधव

(लेखक राजावाडी रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रक्त केंद्रप्रमुख आहेत.)