Join us

भांडूपकरांनी जपले रक्ताचे नाते : रक्तदात्यांना एक लाखाच्या विम्याचे संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 4:07 AM

मुंबई : भांडूपमध्ये रक्ताचे नाते जपत शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी विशेष म्हणजे ...

मुंबई : भांडूपमध्ये रक्ताचे नाते जपत शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी विशेष म्हणजे आयोजक भांडूपचे शिवसेना उपविभागप्रमुख प्रराग सुभाष बने यांनी रक्तदात्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे मोफत अपघाती विम्याचे संरक्षण देत अनोख्या पद्धतीने हा वाढदिवस साजरा केला. यावेळी एकूण ५५ जणांनी रक्तदानाचा हक्क बजावला. यात महिलांसह तरुण मंडळीचा विशेष सहभाग पाहावयास मिळाला.

‘लोकमत’चे संस्थापक स्व. जवाहरलाल दर्डा (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात १ जुलैपासून रक्तदानाचा महायज्ञ सुरू आहे. याच यज्ञात सहभाग घेत पराग बने यांनी शुभेच्छा दिल्या. भांडूपच्या पराग विद्यालयात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पराग बने सांगतात, कोरोनामुळे राज्यभरात रक्ताचा तुटवडा भासत आहे. अशात, रक्तदानासारखे श्रेष्ठदान करत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस करण्याचे ठरवले. रक्तदात्याला महागडे गिफ्ट देण्यापेक्षा त्यांना मोफत विमा संरक्षणाची भेट देण्याचे ठरवले. यावेळी भांडूपकरांंनीही त्याला भरघोस प्रतिसाद दिल्याचे पाहावयास मिळाले.

यावेळी शिवसेना सचिव सिद्धिविनायक मंदिराचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनीही उपस्थित राहून पराग यांच्या उपक्रमाचे कौतुक केले, तसेच यावेळी पराग विद्यालयाचे विश्वस्त बाळकृष्ण बने, आमदार रमेश कोरगावकर, नगसेवक उमेश माने, दीपमाला बढे, तसेच शिवसेना पदाधिकारी आणि कार्यक्रम व्यवस्थापक पराग सावंत, संतोष पाटील आणि संपूर्ण पराग बने मित्र परिवार उपस्थित होता.

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून पराग यांची प्रत्येकापर्यंत मदत पोहोचविण्याची धडपड सुरू आहे. ३ हजार कापडी मास्क, अडीच हजारांंहून अधिक कुटुंबियांना धान्य वाटप, तसेच दीड हजारांहून अधिक चाळी, सोसायटी, इमारतीमध्ये मोफत निर्जंतुकीकरण केले आहे. यासोबत पोलिसांसाठी फेसशिल्ड आणि मास्कचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या काळात बंद असलेली शाळा एसआरपीएफच्या जवानांसाठी उपलब्ध करून देण्यात आली. गेल्या ३८ दिवसांपासून त्यांची लसीकरणाची मोहीम सुरू आहे. यात आतापर्यंत साडेचार हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे, तसेच कोकणवासीयांसाठी दिवसाला ५ हजार जणांसाठी अन्नधान्य, तसेच गरजेच्या वस्तू पुरविण्यात येत आहेत.

फोटो ओळ -

भांडूप येथील रक्तदान शिबिराप्रसंगी आयोजक शिवसेना उपविभागप्रमुख पराग बने, शिवसेना नेते आदेश बांदेकर, पराग विद्यालयाचे विश्वस्त बाळकृष्ण बने आणि संपूर्ण पराग बने मित्र परिवार उपस्थित होता.