पनवेल : एकाच कुटुंबातील व्यक्तीचे एकमेकांशी रक्ताचे नाते असते असे म्हटले जाते, मात्र तळोजा मॅन्यूफॅक्चर असोसिएशनने (टीएमए) यापुढेही जाऊन कॅन्सरग्रस्तांना रक्त देत त्यांच्याशी रक्ताचे नाते जुळवले. यामुळे जगण्यासाठी संघर्ष करणा-या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला असून येथील रक्तदान शिबीराने समाजापुढे अनोखा आदर्श निर्माण केला. खारघर येथील टाटा रुग्णालय आणि तळोजा एमआयडीसीतील कंपन्यांच्या सहकार्याने नुकतेच रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्याला सर्वच स्तरातून चांगला प्रतिसाद लाभला.देशात कॅन्सरच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. या आजाराचे वेगवेगळे टप्पे असतात. पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात असलेल्या रुग्णांचे आयुष्य उपचारामुळे वाढते. टाटा कॅन्सर रुग्णालयात उपचारांसाठी देशातून हजारो रुग्ण येतात. काही वर्षांपूर्वी खारघरमध्येही टाटा रुग्णालयाचे युनिट सुरू करण्यात आले. केमोथेरपी दरम्यान कॅन्सरग्रस्त रुग्णांना रक्ताची आवश्यकता असते. त्यावेळी नातेवाईकांनी रक्त पेढीत धाव घ्यावी लागते. कधीकधी तर रक्तही मिळत नसल्याने रक्तदान शिबीराचे आयोजन केले. यावेळी विविध कंपन्यांचे संचालक अधिकारी आणि कामगारांनी कॅन्सरग्रस्तांना मदत करण्याची तयारी दर्शवली. यात एकूण ८६ बॅग रक्त जमा झाले असल्याचे असोसिएशनचे खजिनदार राजेंद्र पानसरे यांनी सांगितले. समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून आम्ही शिबीर भरवले. यामध्ये रक्तदात्याला पर्यायी रक्ताकरिता प्रमाणपत्र किंवा सवलत दिली नसल्याचे पानसरे म्हणाले. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष संदीप डोंगरे, सहसचिव दिलीप परुळेकर, जयश्री काटकर, मनोज परांजपे, श्रीपाद लेले उपस्थित होते. (वार्ताहर)
कॅन्सरग्रस्तांशी जुळले रक्ताचे नाते
By admin | Published: November 18, 2014 1:46 AM