मुंबई : राज्यात अनलॉकच्या टप्प्यानंतर राज्य शासनाने रक्तदानासाठी आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर एकाच वेळी अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली. मात्र, या रक्तसाठ्याचे योग्य व्यवस्थापन केले नसल्याने मुंबईत पुन्हा रक्ताचा तुटवडा भासत आहे.
राज्य रक्त संक्रमण परिषदेकडे संबंधित रुग्णालयांच्या रक्तपेढ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेजे रुग्णालयाकडे ४०, रेड क्रॉसकडे एबी रक्तगटाच्या केवळ पाच, के.बी. भाभा रक्तपेढीकडे ओ रक्तगटाच्या पाच, जसलोक रुग्णालयाकडे एबी पॉझिटिव्ह गटाच्या सहा तर लो. टिळक रुग्णालयाकडे एबी पॉझिटिव्ह रक्तगटाच्या ६, राजावाडीकडे २५ रक्ताच्या पिशव्या उपलब्ध आहेत. त्यात एक ए पॉझिटिव्ह रक्तपिशवी उपलब्ध आहे.
राज्यात ३४७ रक्तपेढ्या असून, २०१९ मध्ये २९ हजार ३६६ एवढी, तर २०२० मध्ये २६ हजार १०४ एवढी रक्तदान शिबिरे घेण्यात आली होती. राज्यात गेल्या वर्षीपासून करोनासंसर्गामुळे राज्यात सर्वत्रच रक्तसंकलनाला मोठा फटका बसला. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात सुरू झालेली टाळेबंदी, त्यानंतर जमावबंदी यासारख्या कारणांमुळे रक्ताची गरज असून, रक्तदान शिबिरे घेण्यावर निर्बंध आले. राज्यात वर्षभरात कोरोना काळातही रक्तसंकलनात पुणे विभागाने तीन लाख ९१ हजार ६९७ युनिट्स रक्त संकलित करून राज्यात अव्वल क्रमांक पटकवला आहे.