मुंबई
कोरोनाकाळात देशभरात रक्तटंचाईला सामोरे जावे लागत असतानाच आता परळ येथील टाटा रुग्णालयाच्या रक्तपेढीतही रक्ताचा तुटवडा जाणवू लागत असल्याची माहिती समोर आली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यावर रक्तसंकट उभे राहिले. त्यावर मात करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. त्यानंतर स्वयंसेवी संस्था, विविध मंडळे, राजकीय पक्षांनी पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरांचे आयोजन केले. मात्र, दुसरी लाट ओसरतच या शिबिरांची संख्या कमी झाल्याने पुन्हा एकदा रक्तटंचाईजन्य स्थिती निर्माण झाली.
टाटा रुग्णालयाच्या रक्तपेढीतील रक्तसाठा कमी झाल्याची माहिती टाटा मेमोरियलतर्फे देण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी रक्तदान करून सहकार्य करावे. रक्तदान मोहीम आयोजित करण्यासाठी आमच्या रक्तपेढीशी संपर्क साधावा. निवासी संकुलातील रहिवाशांना रक्तदान करायचे असल्यास ०२२-२४१७७००० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन टाटा मेमोरियलच्या वतीने करण्यात आले आहे.