Join us

रक्ताचे नातेही गोठले; स्मशानात साचलेल्या राखेचे करायचे काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 4:06 AM

मुंबई : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनला आता दीड एक वर्ष उलटत असतानाच या काळात अनेकांनी ...

मुंबई : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनला आता दीड एक वर्ष उलटत असतानाच या काळात अनेकांनी आपल्या परिजनांना गमाविले. यातील अनेक जणांचे कोरोनामुळे मृत्यू झाले. कठोर निर्बंधांमुळे अनेकांना अस्थिदेखील घेता आल्या नाहीत आणि घेता आल्या असल्या तरी कठोर निर्बंधांमुळे त्याचे विसर्जनदेखील करता आले नाही. परिणामी रक्ताचे नातेही गोठले; स्मशानात साचलेल्या राखेचे करायचे काय? असा प्रश्न या काळात निर्माण झाला आहे.

मुंबई शहर आणि उपनगरांत मोठ्या प्रमाणावर विविध धर्मीयांच्या स्मशानभूमी आहेत. कोरोना काळात येथे कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांसह उर्वरित कारणांमुळे मृत्यू झालेल्या मृतदेहांवरदेखील अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. मात्र, कोरोना काळात अंत्यसंस्कारादरम्यान नातेवाइकांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. केवळ एक किंवा दोन नातेवाइकांच्या उपस्थितीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यात आता अंत्यसंस्कारानंतर अस्थींचे विसर्जनदेखील कठोर निर्बंधांमुळे अनेकांना करता आलेले नाही. या व्यतिरिक्त मुंबईतल्या बहुतांश स्मशानभूमींमध्ये राख साठविण्यासाठी स्टोअर रुम असून, दोन एक महिन्यांनी हे स्टोअर रिकामे केले जात आहेत. यातील राख ही डंपिंग ग्राऊंडवर टाकली जात असून, मुंबई महापालिकेच्या नियमांप्रमाणेच राखेची विल्हेवाट लावली जात आहे.

लाकूड मोफत

दररोज सहाशे मृतदेहांवर अंत्यसंस्कार होत असतील आणि एका मृतदेहाची पन्नास किलो राख होत असेल तर त्यासाठी तीनशे किलो लाकूड जाळले जाते. मुंबई महापालिका हे लाकूड मोफत देते. हे मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर किमान तीन ते चार टन राख निर्माण होते.

काय म्हणतात सामाजिक कार्येकर्ते

प्रत्येक वॉर्डमध्ये चार ते पाच स्मशानभूमी आहेत. २४ वॉर्डमध्ये सुमारे १५० स्मशानभूमी आहेत. दररोज एका ठिकाणी चार ते पाच मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. म्हणजे मुंबईत दिवसाला सहाशे मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. यातून कितीतरी टन राख निर्माण होते. मात्र, या राखेची विल्हेवाट नीट लावली जात नाही. ती डंपिंग ग्राऊंडवर टाकली जाते. यातून अनेक समस्या निर्माण होतात. यावर ठोस उपाय योजना करणे गरजेचे आहे.

- अंकुश कुराडे

कोरोना रुग्णाच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर त्यांच्या अस्थिदेखील नातेवाइकांच्या नशिबात नसतात आणि अस्थी मिळाल्या तरी त्याचे विसर्जन करताना कठोर निर्बंधांमुळे अडचणी येतात किंवा नातेवाईक स्मशानभूमीत येत नाहीत. त्यांना तिथे प्रवेशदेखील नसतो. मृताचा केवळ चेहरा दाखविला जातो. अस्थी विसर्जनासाठी शासनाने काही प्रमाणात का होईना सूट दिली पाहिजे.

- विनोद घोलप

स्मशानभूमीमध्ये एक किंवा दोन महिने राख साठवून ठेवण्याऐवजी त्यावर प्रक्रिया करीत त्याचा वापर इतर काही घटकांसाठी करता येतो का ? हे महापालिकेने बघावे. जर राख डंपिंग ग्राऊंडवर टाकली जात असेल तर हे योग्य नाही.

- राकेश पाटील

२१० स्मशानभूमींमध्ये मृतदेहांवर अत्यंसंस्कार

मुंबईत ४९ हिंदू स्मशानभूमी

२० मुस्लिम दफनभूमी

१२ ख्रिश्चन दफनभूमी

खासगी २० हिंदू स्मशानभूमी

५० मुस्लिम दफनभूमी

३८ ख्रिश्चन दफनभूमी

७ इतर धर्मीयांच्या स्मशानभूमी

१० विद्युतदाहिनी आणि ४ स्मशानभूमी

विद्युत दहन भूमी

चंदनवाडी, वैकुंठधाम, भोईवाडा, हेन्स रोड, शिवाजी पार्क, जोगेश्वरी येथील ओशिवरा, डहाणूकरवाडी, दौलतनगर, चरई, विक्रोळी येथील टागोर नगर या १० ठिकाणी विद्युत दहन भूमी आहेत.

गॅस शव दाहिनी

गॅस शव दाहिनीची सुविधा सुरू करण्यात आली आहे. यात डहाणूकरवाडी स्मशानभूमी, दौलतनगर स्मशानभूमी, चरई स्मशानभूमी, सायन स्मशानभूमीचा समावेश असून, उर्वरित स्मशानभूमींमध्ये टप्प्याटप्प्याने ही सुविधा सुरू करण्यात येत आहे.