Join us  

रक्ताचा सडा, काचांचा खच अन आक्रोश

By admin | Published: May 27, 2016 4:22 AM

डोंबिवली शहरातील व्यवहार गुरुवारी नेहमीप्रमाणे सुरू असताना पावणेबारा वाजण्याच्या सुमारास सागाव-सागर्ली येथील प्रोबेस कंपनीत अचानक बॉयलरचा स्फोट झाला आणि आकाशात

- प्रशांत माने, कल्याण

डोंबिवली शहरातील व्यवहार गुरुवारी नेहमीप्रमाणे सुरू असताना पावणेबारा वाजण्याच्या सुमारास सागाव-सागर्ली येथील प्रोबेस कंपनीत अचानक बॉयलरचा स्फोट झाला आणि आकाशात आगीचा भलामोठा लोळ उठला... पाठोपाठ काळ्याकुट्ट धुराचे लोट उठले... कानठळ्या बसवणाऱ्या त्या स्फोटाने डोंबिवली पश्चिमेकडील इमारतीही भूकंप झाल्यावर हादरतात तशा हादरल्या. क्षणार्धात माणसे रस्त्यावर सैरावैरा पळू लागली... घटनास्थळी रक्तबंबाळ झालेली अनेक माणसे दिसत होती. अनेकांना आपण किती गंभीर जखमी झालो आहे, हेही कळत नव्हते. काही जण जखमांच्या वेदना आणि स्फोटाची भीती यामुळे रस्त्यात कोसळले... परिसरातील इमारती, हॉटेल, दुकाने, वाहने यांच्या काचा चक्काचूर झाल्याने रस्त्यात काचांचा खच पडला होता... सुरुवातीची पाच-सात मिनिटे काय झाले आहे, हे कुणालाच कळत नव्हते. मग, जे या स्फोटाच्या तडाख्यातून वाचले, त्यांनी आजूबाजूच्या जखमींना मदत देण्याकरिता धावपळ सुरू केली. मदतीकरिता पुढे आलेले हात जसे होते, तसेच स्फोटाच्या ठिकाणी जास्तीतजास्त पुढे जाऊन मोबाइलवर फोटो काढण्याची हौस भागवणारे हवशे-गवशेही रस्त्यावर फिरत होते. स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की, आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्यांना क्षणभर हा दहशतवाद्यांनी घडवलेला बॉम्बस्फोट वाटला. दूरवर असलेल्या इमारती हादरल्याने तेथील रहिवाशांना हा भूकंपाचा धक्का तर नव्हे ना, अशी शंका आली. मात्र, स्फोटानंतर लागलीच धुराचे लोट हवेत पसरू लागल्याने हा एमआयडीसी परिसरातील अपघात असल्याचे स्पष्ट झाले. घातपाताच्या दिशेनेही तपास प्रोबेस कंपनीतील स्फोटामागे घातपाताची शक्यताही असू शकते, या दिशेने पोलीस तपास करीत आहेत. अलीकडेच डोंबिवलीतील गणपती मंदिर दहशतवाद्यांच्या हिट लिस्टवर असल्याचे वृत्त होते. तसेच कल्याणमधील काही युवक आयसीस संघटनेत दाखल झालेले आहेत. औद्योगिक वसाहतीत या पूर्वीही बॉयलरचे स्फोट झाले होते. मात्र, त्याची तिव्रता इतकी नव्हती. जर हा घातपात नसेल, तर कंपनीने त्यांना अनुमती असलेल्या रसायनांच्या साठ्यापेक्षा दोनशे टक्के अधिक रसायने साठवल्यानेच इतका शक्तीशाली स्फोट होऊ शकतो, असे पोलिसांचे म्हणणे आहे.एमआयडीसीच्या या औद्योगिक वस्तीत निवासी बांधकामे मोठ्या प्रमाणावर असल्याने या परिसरात कामगारांबरोबरच विद्यार्थी, महिला यांची वर्दळ असते. शेकडो वाहने या वसाहतीमधील रस्त्यावरून मुख्य रस्त्याच्या दिशेने जात असतात. अचानक एका कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाल्याने रस्त्यावरून जाणारे दुचाकीस्वार, मोटारचालक यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. दुचारीस्वार रस्त्यावर पडले. स्फोट झालेल्या व आजूबाजूच्या कंपन्यांमधील काचा, पत्र्यांचे तुकडे उडाल्याने रस्त्यावरील पादचारी व वाहनचालक जखमी झाले. कुणाच्या डोक्यातून तर कुणाच्या चेहऱ्यावरून रक्त ओघळू लागले. स्फोटापाठोपाठ या परिसरात धुराचा दाट पडदा तयार झाल्याने मागून येणारी वाहनेही अडखळली. स्फोटाच्या अगदी जवळपास असणाऱ्यांना तर बहिरेपणाचा त्रास झाला.