भररस्त्यात प्रेयसीवर केले ब्लेडने वार, प्रियकराचा प्रताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 02:27 AM2018-03-29T02:27:05+5:302018-03-29T02:27:05+5:30
प्रियकराने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली.
मुंबई : परेलमध्ये बुधवारी सकाळच्या सुमारास प्रेयसीवर ब्लेडने वार करत, प्रियकराने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. दुसऱ्या प्रियकरासाठी प्रेयसीने त्याला टाळल्याच्या संशयातून प्रियकराने हा प्रताप केल्याचे तपासात उघड झाले. दोघांवरही केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आर. ए. के. मार्ग पोलिसांनी प्रियकर पुकार नाटे (२२) याच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.
डोंबिवली येथील रहिवासी असलेला नाटे हा बेरोजगार आहे. पूर्वी तो परेल परिसरात राहत होता. येथील २१ वर्षीय तरुणीसोबत त्याचे गेल्या ७ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, वर्षभरापासून प्रेयसी त्याला टाळत होती. याचा जाब विचारण्यासाठी नाटेने तिला परेलच्या जेरबाई वाडिया रोड परिसरात अडविले. तेथे तिच्याकडे विचारणा केली असता, प्रेयसीने अन्य तरुणासोबत प्रेमसंबंध सुरू असल्याचे सांगितले.
याच रागात त्याने जवळील ब्लेडने तिच्यावर वार केले. त्यानंतर स्वत:वरही वार केले. दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर, स्थानिकांनी
त्यांना केईएम रुग्णालयात दाखल केले.
घटनेची वर्दी लागताच आर. ए. के मार्ग पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी तरुणीचा जबाब नोंदविला. त्यामध्ये वरील घटनाक्रम समोर आला. या प्रकरणी प्रियकराविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
त्याला डिस्जार्ज मिळताच, या गुन्ह्यात अटक करण्यात येईल,
अशी माहिती आर. ए. के. मार्ग
पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भागवत बनसोड यांनी
दिली.