Join us

जुहू बीचवर जेलीफिशचे साम्राज्य, पालिका प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 11:56 AM

मालाडच्या अकसा बीच पाठोपाठ आता जुहू सिल्व्हर बीच व जुहू बीचवर मोठ्या प्रमाणात रविवारी व सोमवारी जेलीफिश आले आहेत.

- मनोहर कुंभेजकरमुंबई - मालाडच्या अकसा बीच पाठोपाठ आता जुहू सिल्व्हर बीच व जुहू बीचवर मोठ्या प्रमाणात रविवारी व सोमवारी जेलीफिश आले आहेत. रविवारी जुहू सिल्व्हर बीचवर सुमारे 50 पर्यटकांना तर जुहू बीचवर सुमारे 20 ते 25 पर्यटकांना जेलीफिशने डंख मारले आहेत.सोमवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास तर जुहू सिल्व्हर बीच वर द्राक्षाच्या घडाप्रमाणे जेलीफिश आले आहेत. येथे जेलीफिशच्या दहशतीमुळे आज अनेक सेलिब्रिटी व मॉर्निंग वॉक करणाऱ्यांनी जुहू सिल्व्हर बीचकडे पाठ फिरवली आहे. सी गार्डीयन लाईफ गार्ड असोसिएशनचे अध्यक्ष सुनील कनोजिया यांनी लोकमतला ही माहिती दिली.

या संस्थेतर्फे पर्यटकांनी जुहू सिल्व्हर बीचवर पाण्यात जाऊ नये यासाठी आमचे 15 कार्यकर्ते जातीने लक्ष ठेऊन आहेत. काल 50 पर्यटकांना येथे जेलीफिश चावल्यावर जालीम उपाय म्हणून आईस पॅक व लिंबूची सुविधा येथे आमच्या संस्थेने उपलब्ध करून दिल्याची माहिती कनोजिया यांनी दिली. दरम्यान, जुहू बीचवर देखील काल सुमारे 20 ते 25 पर्यटकांना जेलीफिशने डंख मारले आहेत.जुहू चौपाटीवर किनाऱ्यालगत मोठा खड्डा असून यामध्ये मोठ्या प्रमाणात जेलीफिशचे साम्राज्य काल होते.येथे काल मोठ्या प्रमाणात पर्यटक आल्यामुळे त्यांना आणि त्यांच्या लहान मुलांना जेलीफिशने तडाखा दिला अशी माहिती सूत्रांनी दिली.

तर पालिकेने येथे जेलिफिश संदर्भात पर्यटकांना धोक्याची सूचना देणारे  बोर्ड येथे लावले असून आज जुहू चौपाटीवर रुग्णवाहिका सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती के पश्चिम वॉर्डचे सहाय्यक पालिका आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी लोकमतशी बोलतांना दिली.आमचे जीवरक्षक मेगाफोन वरून पाण्यात उतरू नका, असे आवाहन करत असल्याची माहिती त्यांनी दिली.दरम्यान एकीकडे जेलीफिशचे साम्राज्य असतांना पाण्यात उतरू नका, असे वारंवार आवाहन जुहू बीचवरील जीवरक्षक काल करत होते. तरी पण एक 34 वर्षाचा तरुण खोल पाण्यात बुडत असताना येथील जीवरक्षक मनोहर शेट्टी,सर्वेश ठाकूर,संदीप मोरे यांनी पाण्यात उड्या मारून या तरुणाला बुडतांना वाचवले.