Join us  

जुहू बीचवर ब्ल्यू बॉटल जेली फीशची दहशत; जेली फीश चावल्यावर काय करावे?

By मनोहर कुंभेजकर | Published: July 25, 2022 10:30 AM

नागरिकांनी अनवाणी पाण्यात उतरू नये, समुद्रकिनारी फिरू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई-दरवर्षी पावसाळ्यात मुंबईच्या समुद्रकिनारी जेली फीश येतात. गिरगाव  चौपाटी,जुहू चौपाटी,आक्सा चौपाटी या प्रमुख ठिकाणी जेली फीशची दहशत असते. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात गिरगाव चौपाटीवर जेली फीश चावल्याच्या घटना घडल्या आहेत. गणपती विसर्जनापर्यंत जेली फीशचासमुद्रात वावर असतो. यंदा देखिल गेली तीन-चार दिवस जुहू चौपाटीवर ब्ल्यू बॉटल जेली फीशची दहशत आहे.

चार दिवसांपूर्वी आणि काल जुहू चौपाटीवर ब्ल्यू बॉटल जेलीफिश दिसले होते. तर आज सकाळी पुन्हा जुहू चौपाटीवर ठिकठिकाणी जेली फीश आले आहे. तर काल सकाळी जुहू चौपाटीवर टार बॉल्स आले होते.ते आज भरती बरोबर पुन्हा समुद्रात वाहून गेले अशी माहिती सी गार्डीयन लाईफ गार्ड असोसिएशनचे संस्थापक सुनील कानोजिया यांनी लोकमतला दिली.  आमचे सर्व 20 जीवरक्षक जुहू सिल्व्हर बीच,गोदरेज बंगला परिसरात  तैनात असून पर्यटकांनी अनवाणी समुद्रकिनारी जावू नये असे आम्ही त्यांना आवाहन करत असतो अशी माहिती त्यांनी दिली.

जुहू चौपाटीवर सलग पाचव्या वर्षी आले टारबॉल्स असे वृत्त कालच्या लोकमत ऑन लाईनवर प्रसिद्ध होताच सोसल मीडियावर आणि पालिका प्रशासनाच्या वर्तुळात व्हायरल झाले.

कसे असतात जेली फीश

पावसाळ्यात समुद्राकडून जमिनीच्या दिशेने जोरदार वारे वाहतात.समुद्राला भरती आल्यावर वजनाने हलके असलेले जेली फीश समुद्रकिनाऱ्या जवळ येतात. ब्ल्यू बॉटल जेली फीश हे  विषारी असून साधारणपणे हवा भरलेल्या निळ्या पिशवी सारखे असतात.त्यांच्या टेटॅकल्स पेशीमध्ये विषारी द्रव्य असून ते चावल्यावर असह्य वेदना होतात.पोर्तुगीज मॅन ओ वॉर या नावाने त्यांची ओळख आहे.

जेली फीश चावल्यावर काय करावे

जेली फीशचा मानवी संपर्क झाल्यावर ते कचकचून चावतात.त्यांच्या वेदना असह्य असतात.अश्यावेळी जिकडे त्यांनी चावा घेतला आहे,तिकडे बर्फाने चोळून लिंबू लावावे. जर जखम जास्त असल्यास जवळच्या हॉस्पिटलमध्ये जावे अशी माहिती सुनील कानोजिया यांनी दिली. पालिका प्रशासनाने जुहू चौपाटीवर ऍम्ब्युलन्स तैनात करून वैद्यकीय पथक तैनात करून जेलीफीश चावल्यावर प्रथमोपचाराची सुविधा आणि औषधांचा साठा सज्ज ठेवावा अशी मागणी त्यांनी केली.

पालिका प्रशासन सज्ज

येथे जेली फीश  आल्याच्या घटनेची पालिका प्रशासनाने दखल घेतली आहे.पालिका प्रशासन आवश्यक त्या उपाययोजना करत असून पालिका प्रशासन सज्ज असल्याची माहिती के पश्चिम वॉर्डचे सहाय्यक आयुक्त डॉ.पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. तर नागरिकांनी अनवाणी पाण्यात उतरू नये, समुद्रकिनारी फिरू नये असे आवाहन त्यांनी केले आहे. 

टॅग्स :मुंबई