गेले पालकमंत्री कुणीकडे? मुंबई उपनगरातील नागरिकांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 04:32 PM2018-08-09T16:32:43+5:302018-08-09T16:33:41+5:30
जेलीफिशच्या दहशतीनंतर उपनगरातील चौपाट्यांना भेट देण्याची नागरिकांची मागणी
मनोहर कुंभेजकर
मुंबई - मुंबईमधील जुहू, जुहू सिल्व्हर बीच, अकसा बीच येथे गेल्या 1 ऑगस्ट पासून जेलीफिशची दहशत पसरली आहे. त्यामुळे पर्यटक आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गिरगाव चौपाटीवर जेलीफिश पर्यटकांना चावल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पश्चिम उपनगरात जेलीफिशची दहशत जास्त आहे. मात्र बुधवारी (9 ऑगस्ट) दुपारी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी गिरगाव चौपाटीला भेट देऊन येथील जेलीफिशबाबत माहिती घेत पालिका अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या.
आमच्या उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे हे येथील चौपाट्यांना कधी भेटी देणार असा सवाल उपनगरातील नागरिकांनी लोकमतशी बोलताना केला आहे. जेलीफिशच्या दहशतीमुळे उपनगरातील चौपाट्यांना विनोद तावडे यांनी लवकर भेट देण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. पालक मंत्र्यांच्या व्यस्त कार्यक्रमांमुळे त्यांचे मतदार संघाकडे दुर्लक्ष होत आहे. तसेच अनेक कार्यक्रमांना त्यांना उपस्थित राहता येत नाही अशा प्रतिक्रिया काही नागरिकांनी लोकमतशी बोलताना दिल्या आहेत.