मुंबई : टॅक्सीत लावलेल्या ब्ल्यू लाईटद्वारे फसवणूक करणाऱ्या दोन जणांपैकी एकाला माटुंगा पोलिसांनी अटक केली आहे. ब्ल्यू लाईटद्वारे नोटा पलटी करून प्रवाशांची फसवणूक करणारी टोळी पुन्हा दादरमध्ये सक्रीय झाली आहे़ एका इसमाला भुरळ पाडून चार हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी टॅक्सी चालकाला पोलिसांनी अटक केली आहे़ त्यांच्या साथीदाराचा शोध सुरू आहे.
चेंबूर येथे राहणारे करण मेहता हे शनिवारी माटुंगा परिसरातील सासरवाडीत आले होते़ सकाळी ७ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास चेंबूरला जाण्यासाठी ते टॅक्सीत बसले. काही अंतरावरच टॅक्सी चालकाचा मित्र टॅक्सीत येऊन बसला. टॅक्सी चालकाने मेहतांशी बोलण्यातून विश्वास संपादन केला. त्यानंतर टॅक्सी चालकाच्या मित्राने एका बहाण्याने चार हजार रुपयांचे सुट्टे पैसे मागितले. त्या मोबदल्यात टॅक्सी चालकाच्या मित्राने मेहतांना चार हजाराच्या सुट्ट्या पाचशेच्या नोटा दिल्या. ज्यावेळी हा व्यवहार झाला, त्यावेळी टॅक्सीमधील निळ्या रंगाची लाईट चालू होती. विविध चर्चांमुळे त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून नोटा न पाहताच खिशात ठेऊन दिल्या.
त्यानंतर पुढे टॅक्सी बंद पडली. बराच उशीर झाल्याने टॅक्सी चालू होत नसल्याचे पाहून मेहता यांनी दुसरी टॅक्सी पकडून चेंबूरला निघून गेले. चेंबूरला पोहोचताच टॅक्सीचे बिल देण्यासाठी सुटे पैसे काढले असता, त्यामध्ये पाचशेच्या नोटांऐवजी पन्नासच्या नोटा निघाल्या.
भुरळ घालून त्यांची फसवणूक झाल्याचे निश्चित झाल्यानंतर त्यांनी तत्काळ माटुंगा पोलीस ठाणे गाठून घडलेला संपूर्ण प्रकार सांगून तक्रार केली. माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत भोईटे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी पोलीस पथकाद्वारे मेहतांना घेऊन दादरमध्ये टॅक्सी चालकांच्या तळावर जाऊन टॅक्सी चालकाचा शोध सुरू केला़ दादरला स्वामी नारायण मंदिर येथे टॅक्सी चालक योगेश शर्मा उर्फ बिल्ला (३४) सापडला. त्याला पोलिसांनी अटक केली़ त्याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे़ पोलीस आरोपीच्या साथीदारांचा शोध घेत आहेत़ याप्रकरणी अजून कोणाची फसवणूक झाली आहे का, याचाही तपास सुरू आहे़