लसीकरणाचे उद्धिष्ट गाठण्यासाठी फिरते पथक; मुंबई पालिकेकडून राबविण्यात येतेय मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 07:44 PM2021-10-18T19:44:16+5:302021-10-18T19:44:30+5:30
मुंबईत १५ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरु आहे. त्यानुसार १८ वर्षांवरील ९५ लाख लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लसीचा डोस देण्यात येत आहे.
मुंबई - कोविड प्रतिबंधक लसीकरणामुळे मुंबईतील कोरोनाचा प्रसार नियंत्रणात ठेवणे पालिकेला शक्य झाले आहे. मात्र अद्यापही ४५ टक्के मुंबईकरांचे दोन्ही डोस पूर्ण झालेले नाही. त्यामुळे अशा नागरिकांना शोधून त्यांचे ऑन दि स्पॉट लसीकरण करण्यासाठी महापालिकेचे फिरते पथक तैनात ठेवण्यात आले आहे. अंधेरी ते सांताक्रूख पश्चिम, माहीम, दादर, धारावी या भागांमध्ये अशा फिरती वाहने सुरु करण्यात आली आहेत. पहिल्याच दिवशी दादरमध्ये अशा फिरत्या पथकाद्वारे दीडशे नागरिकांना लस देण्यात आली.
मुंबईत १५ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरु आहे. त्यानुसार १८ वर्षांवरील ९५ लाख लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लसीचा डोस देण्यात येत आहे. यापैकी आतापर्यंत ९७ टक्के नागरिकांनी पहिला डोस तर ५५ टक्के नागरिकांनी दोन्ही डोस घेतला आहे. निर्बंध शिथिल केल्यानंतरही कोरोनाचा प्रसार सध्या नियंत्रणात असला तरी तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे दिवाळीपर्यंत सर्व मुंबईकरांचा पहिला डोस पूर्ण करण्याचे लक्ष्य पालिका प्रशासनाने ठेवले होते. त्यानुसार अंथरुणावर खिळलेले, गर्भवती महिला, स्तनदा माता आदींसाठी लसीकरण सुरु करण्यात आले.
महिलांसाठी तसेच दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांकरिता विशेष मोहीम पालिकेमार्फत राबविण्यात येत आहे. त्यांनतर आता लसीकरण केंद्रापर्यंत न पोहोचलेल्या लोकांचा शोध पालिकेने सुरु केला आहे. यासाठी विभागस्तरावर तयार करण्यात आलेल्या फिरत्या वाहनामध्ये डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि लस साठविण्यासाठी शीतगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. या फिरत्या वाहनाद्वारे कोविशील्ड आणि कोवॅक्सिन अशा दोन्ही लस उपलब्ध करण्यात येत आहेत.
नागरिकांकडून चांगलं प्रतिसाद....
- के पश्चिम म्हणजे अंधेरी पश्चिम, जुहू या भागात असे फिरते वाहन शुक्रवारपासून सुरु करण्यात आले आहे. जुहू चौपाटी, धार्मिक स्थळ, बाजारपेठ आणि गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जाऊन हे पथक लस न घेतलेल्या नागरिकांना शोधणार आहेत.
- जी उत्तर विभागात सोमवारी असे फिरते वाहन दादर भागामध्ये पाठविण्यात आले होते. एक रुग्णवाहिका, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी यांचा या पथकामध्ये समावेश आहे. दादर बाजारपेठेत लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असल्याने या ठिकाणी हे वाहन फिरविण्यात येणार आहे.
बाजारपेठ, कार्यालय, गृहनिर्माण सोसायट्या येथे जाऊन या वाहनातील वैद्यकीय कर्मचारी नागरिकांचे लसीकरण करतील. या वाहनात खुर्च्यांची सोयदेखील असल्याने लस घेतल्यानंतर ती व्यक्ती अर्धा तास त्या ठिकाणी थांबू शकते. एका दिवसात सोमवारी दीडशे नागरिकांना कोविशील्ड लस देण्यात आली. - किरण दिघावकर (सहायक आयुक्त; जी उत्तर विभाग)
एकूण लसीकरण - एक कोटी ३४ लाख ३५ हजार ४१९
पहिला डोस - ८६ लाख एक हजार ५५०
दुसरा डोस - ४८ लाख ३३ हजार ८६९