मुंबई – दिवाळीच्या तोंडावर पालिका कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर झाला नसल्याने आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रशासनाचे कान टोचले होते. त्यानंतर आता मुंबई महापालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांसाठी २६ हजार रुपये बोनस जाहीर केला आहे. तर आरोग्य सेविकांनाही एक महिन्याचा पगार बोनस म्हणून मिळणार आहे. दिवाळी बोनस संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत झालेल्या बैठकीनंतर पालिका प्रशासकांनी हा निर्णय घेतला आहे.
मागील वर्षी पालिका कर्मचाऱ्यांना २२५०० रुपये बोनस देण्यात आला होता. यावर्षी किमान ३० हजार रुपये बोनस मिळावा यासाठी कर्मचारी संघटनांनी पालिका प्रशासनाकडे मागणी केली होती. अलीकडेच कर्मचारी संघटनांची पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यासोबत बैठक झाली होती. त्यानंतर पालिका आयुक्तांनी मुख्यमंत्र्यासोबत बैठक घेतली. त्यामुळे यंदा महापालिका कर्मचाऱ्यांना २६ हजार रुपये बोनस जाहीर करण्यात आला आहे.
वर्षा निवासस्थानी मुंबई महापालिकेच्या विविध कर्मचारी आणि कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. यावेळी महापालिका आयुक्त आय एस चहल, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव के एच गोविंदराज, बेस्टचे महाव्यवस्थापक विजय सिंघल, माजी आमदार किरण पावसकर यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. गेल्या वर्षी दिवाळी सानुग्रह अनुदान देताना पहिल्यांदाच २५०० ने वाढ करण्यात आली होती. यावर्षी त्यात वाढ करून २६ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला.
आदित्य ठाकरेंच्या ट्विटनं सरकारला जाग
माजी मंत्री व वरळी विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दुपारी याबाबत ट्विट केले होते. त्यानंतर महापालिका प्रशासनाने बोनस जाहीर केला. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी हा ट्विटचा इम्पॅक्ट असल्याचे म्हणत सरकारवर टीका केली, आदित्य ठाकरे म्हणाले की, खोके सरकारला आज तातडीने बैठक बोलावून घाईघाईने कामगारांना बोनस जाहीर करावा लागला. बीएमसी कर्मचारी आणि बेस्ट आपल्या शहरासाठी अथक मेहनत घेत असतात. खोके सरकारला त्यांचा विसर पडला होता. परंतु ज्या कार्यकर्त्यांनी हे माझ्या लक्षात आणून दिले आणि मला यावर आवाज उठवण्यास सांगितले त्यांचा मी आभारी आहे असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं.
त्याचसोबत आता हे पैसे कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होतात की नाही हे पाहावं लागेल कारण भाजपा सरकावर आमचा विश्वास नाही. आमची एक मागणी दिवाळी बोनसबाबत १२ तासांत पूर्ण झाली, आता दुसरी मागणी महापालिका आयुक्त पूर्ण करतात का हे पाहू. काम पूर्ण न केलेल्या कंत्राटदारांवर कारवाई होणार का? की रस्ते घोटाळ्यातील मुख्यमंत्र्यांच्या कंत्राटदार मित्राला दिवाळी बोनस देण्यासाठी घटनाबाह्य मुख्यमंत्री बीएमसी भाग पाडणार का असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.