तमीळ भाषिक सफाई कामगारांकडून मराठा सर्वेक्षणाचा घातलाय घाट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 09:53 AM2024-01-24T09:53:09+5:302024-01-24T09:54:59+5:30

मराठा सर्वेक्षणासाठी पालिका प्रशासनाने कर्मचारी, अभियंत्यांबरोबरच सफाई कामगारांनाही कामाला लावले आहे.

BMC assigned the task of maratha survey by tamil speaking sweepers in mumbai | तमीळ भाषिक सफाई कामगारांकडून मराठा सर्वेक्षणाचा घातलाय घाट

तमीळ भाषिक सफाई कामगारांकडून मराठा सर्वेक्षणाचा घातलाय घाट

मुंबई : मंगळवारपासून सुरू झालेल्या मराठा सर्वेक्षणासाठी पालिका प्रशासनाने कर्मचारी, अभियंत्यांबरोबरच सफाई कामगारांनाही कामाला लावले आहे. निरक्षर असलेल्या तमीळ भाषिक सफाई कामगारांची या कामासाठी नियुक्ती होताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यामुळे सर्वेक्षणातील १५० हून अधिक प्रश्नांची उत्तरे आणि माहिती मिळवताना त्यांच्या नाकीनऊ आले. 

या सर्वेक्षणासाठी पालिकेने कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. महाराष्ट्र म्युनिसिपल कामगार युनियनचे सरचिटणीस मिलिंद रानडे यांना आलेला अनुभव सांगताना ते म्हणाले की, हरिजनकुमार आनंद, देवेंद्र मुत्तुस्वामी आणि देवेंद्र अरमुगम या तीन सफाई कामगारांना हे काम दिले आहे. हे सफाई कामगार स्वतः शिक्षित नसतील तर ते सर्वेक्षणासाठीची योग्य व अचूक माहिती कसे गोळा करतील, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

मराठा नोंदीसाठी १००, अमराठीसाठी १० रुपये :

  या कामाकरिता कर्मचाऱ्यांना मानधन दिले जाणार आहे. पालिकेच्या वर्ग २ व त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक महिन्याच्या मूळ वेतनाच्या ५० टक्के इतकी रक्कम, तर पर्यवेक्षक व प्रगणकांना प्रत्येकी १० हजार रुपये व ५०० रुपये प्रवास भत्ता देण्यात येणार आहे. 

 सर्वेक्षणादरम्यान कर्मचाऱ्याला विचारले असता, एका घरामागे मराठा नोंद झाल्यास १०० रुपये आणि अमराठी नोंदीसाठी १० रुपये अशी रक्कम मिळणार आहे.

सर्वेक्षणाचे अर्ज भरणे, मोबाइल ॲपचा वापर करणे ही कामे अमराठी कर्मचाऱ्यांना करता येणार नाहीत.  या कामगारांना तमीळ भाषेत केवळ स्वतःची स्वाक्षरी करता येते. त्यामुळे हे सर्वेक्षण उरकून टाकायचे आहे. पालिकेची ही कृती मराठा समाजाची फसवणूक आहे.- मिलिंद रानडे, सरचिटणीस, महाराष्ट्र म्युनिसिपल कामगार युनियन

मराठा सर्वेक्षणासाठी घरोघरी  हे पालिका कर्मचाऱ्यांचे काम आहे का? यामुळे सर्वेक्षणाचे काम योग्य पद्धतीने होईल की नाही यामध्ये शंका आहे. शिवाय पालिकेची प्रशासकीय कामेही रखडण्याची शक्यता आहे. सर्वेक्षणासाठी सक्षम अशा सरकारी महसूल विभागाकडून हे काम होणे अपेक्षित आहे.- गॉडफ्रे पिमेंटा, 
सामाजिक कार्यकर्ते

‘आम्ही मराठी नाही, आमचा काय संबंध?’

 आम्ही मराठी नाही, आमचा काय संबंध? आमची माहिती कशाला? मालमत्तेची माहिती कशाला तुम्हाला?  तुमचे ओळखपत्र खरे आहे का? आमच्या सोसायटीत बाहेरच्यांना परवानगी देत नाही, अशा प्रश्नांनी मराठा सर्वेक्षण करणाऱ्या प्रगणक त्रस्त आहे. 

 काही ठिकाणी लोक सहकार्य करतात, तर काही ठिकाणी आडवे प्रश्न विचारतात. यात आणखी भर म्हणजे दिवसभर मोबाइल वापरल्याने अनेकांचे मोबाइल स्वीफऑफ झाले होते. 

 महापालिकेच्या  २५ हजार कर्मचाऱ्यांवर सर्वेक्षणाचे काम सोपविण्यात आले आहे. त्यात परिचारिका आहेत, इंजिनिअर, डॉक्टर, घनकचरा व्यवस्थापन, वाहतूक शाखा अशा अनेक विभागातील कर्मचारी-अधिकारी आहेत. 

 ३१ जानेवारीपर्यंत त्यांना सर्वेक्षणाचे काम पूर्ण करायचे  आहे. मंगळवारपासून  या कामास सुरुवात झाली. १५६ प्रश्नांची प्रश्नावली त्यासाठी तयार केली आहे.  

नेटवर्कमधील अडचणी :

पहिल्या दिवशी काही प्रगणकांना ॲप आणि नेटवर्कच्या अडचणी जाणविल्या. काही ठिकाणी विशिष्ट मोबाइल कंपन्यांचे नेटवर्क मिळते. त्या ठिकाणी अन्य मोबाइल वापरणाऱ्या प्रगणकांना नेटवर्कच्या अडचणी येत होत्या. ॲप हँग होण्याचे प्रकारही घडत आहेत.  पूर्ण माहिती भरून झाल्यानंतर डेटा सेव्ह होत नव्हता . 

काही अडचणी सोडल्यास अनेक ठिकाणी लोकांनी  उत्साहाने माहिती दिली . सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. घरी कोणी कर्तापुरुष नसेल तर पुन्हा येण्याबाबत विनंती केली,  चहापाणी विचारले, असे ‘डी’ वॉर्डातील  एका प्रगणकाने सांगितले.

Web Title: BMC assigned the task of maratha survey by tamil speaking sweepers in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.