मुंबई : राज्यभरात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाच मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आपल्या कर्मचारी वर्गास दिवाळीपूर्वीच तब्बल १५ हजार रुपये एवढे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागण्याची शक्यता आहे. आचारसंहितेदरम्यान कोणताही निर्णय घेता येत नसल्याच्या कारणास्तव मुंबई महापालिकेने यासंदर्भातील निर्णय घेतल्याची राजकीय चर्चा रंगली आहे.मुंबई महापालिकेच्या कर्मचारी वर्गास दरवर्षी दिल्या जात असलेल्या बोनसच्या मुद्द्यावरून रान उठते. प्रशासन आणि कामगारांच्या युनियन यांच्यात यावरून अनेक बैठका होतात आणि वाटाघाटी झाल्यानंतर मुंबई महापालिका प्रशासनाकडून बोनसची रक्कम जाहीर केली जाते. या वर्षी मात्र यापैकी काहीच झाले नाही. यंदा कोणत्याही मागणीशिवाय प्रशासनाने कर्मचारी वर्गास १५ हजार रुपयांचा बोनस जाहीर केला आहे. महापालिका प्रशासनाने याबाबतचे परिपत्रक जाहीर केल्याची सूत्रांची माहिती असून, आगामी वेतनात या बोनसची रक्कम जमा केली जाईल. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, पूर्णवेळ पालिका कर्मचारी वर्गास सरसकट १५ हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षीदेखील १५ हजार रुपये बोनस देण्यात आला होता. त्याआधी १४ हजार ५०० रुपये बोनस जाहीर करण्यात आला होता. गेल्या वर्षी यात पाचशे रुपयांची वाढ करण्यात आली आणि ही रक्कम १५ हजार करण्यात आली. या वर्षी रकमेत काहीच वाढ करण्यात आली नसल्याचे चित्र आहे. पालिकेने इतक्या लवकर बोनसचा निर्णय घेतल्याने सर्व स्तरांतून आश्चर्य व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे कोणतीही मागणी केली नसताना प्रशासनाने निर्णय घेतल्याने कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपये बोनस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 6:16 AM