मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने देशातील गोर-गरिबांचे आरोग्य चांगले राहावे, या दृष्टीने केंद्रीय अर्थसंकल्पात जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना (आयुष्यमान भारत) आखली आहे. मात्र, मुंबई महापालिकेने आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात पालिकेच्या रुग्णालयातील उपचारांच्या शुल्कात वाढ केल्याने मुंबईतील रुग्णांवर ताण येणार आहे. पालिका रूग्णालयांवरील ताण व खर्च वाढत असल्याने उपचार शुल्कात वाढ करण्याच्या प्रस्तावाला गटनेत्यांच्या बैठकीत आज मंजुरी देण्यात आली. दाेन वर्षांपूर्वी प्रशासनाने आणलेला शुल्क वाढीचा प्रस्ताव महापालिका निवडणुकीच्या काळात लांबणीवर पडला हाेता. मात्र मुंबई बाहेरील रुग्णांसाठी 30 टक्के तर मुंबईतील रूग्णांसाठी 20 टक्के शुल्क वाढ मंजूर करण्यात आली आहे. जेष्ठ नागरिकांना मात्र मोफत उपचार मिळणार आहेत.
पालिकेच्या केईएम, नायर आणि लोकमान्य टिळक या तीन रुग्णालयावर पालिका दरवर्षी सरासरी 600 ते 700 कोटी रुपये खर्च करते. त्यापैकी यातून दहा टक्केही उत्पन्न पालिकेला मिळत नाही. 2002 मध्ये पालिकेने उपचार शुल्कात वाढ केली होती. उत्तपन्नाचे प्रमुख स्त्राेत असलेला जकात कर बंद झाल्याने दर्जेदार आराेग्यसेवेसाठी निधी उभा राहणे आवश्यक आहे. यासाठी पालिका प्रशासनाने जून 2016 मध्ये रुग्ण सेवेच्या शुल्कात 75 ते 100 टक्के दरवाढ करण्याचा प्रस्ताव मांडला होता. तसेच मुंबई बाहेरील नागरिकांना अतिरीक्त 20 टक्के शुल्क आकारण्याची शिफारस करण्यात आली हाेती.
मात्र, निवडणुकीच्या काळात हा प्रस्ताव लांबणीवर टाकण्यात आला. यामध्ये आता सुधारणा करीत मुंबईतील नागरिकांना 20 टक्के तर मुंबई बाहेरील नागरिकांच्या उपचार शुल्कात 30 टक्के वाढ करण्याचा निर्णय गटनेत्यांच्या बैठकीत आज घेण्यात आला. पालिकेच्या सर्व रुग्णालयात आतापर्यंत जेष्ठ नागरिकांना निम्या शुल्कात उपचार मिळत होते. मात्र यापुढे मोफत उपचार देण्याच्या अटीवरच गटनेत्यांनी आज या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. पालिका महासभेच्या मंजुरीनंतर नवीन दर लागू हाेतील.
असेे काही शुल्क (रुपयांत ) वैद्यकिय सेवा - सध्याचे दर - मुंबईतील नागरिकांसाठी - मुंबई बाहेरील नागरिकांसाठी अतिविशेष शस्त्रक्रिया - पाच हजार - सहा हजार - सहा हजार 500 विशेष शस्त्रक्रिया - 500 - 600-650 किरकोळ शस्त्रक्रिया - 200-240-260 प्रसुती (दुसऱ्या मुलानंतर)-500-600-650 एमआरआय-दोन हजार 500 - तीन हजार - तीन हजार 250 अल्ट्रा सोनोग्राफी - 100 - 120- 130 थायरॉईड-100-150 कलर डॉपलर-500-600-650