Join us

BMC Budget: मुंबई महापालिकेचा ‘पेटारा’ उद्या खुला होणार, आयुक्त स्थायीत सादर करणार अर्थसंकल्प

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2022 9:19 AM

BMC Budget: आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचा  २०२२ - २३ वर्षाचा अर्थसंकल्प गुरुवारी (दि. ३) सादर केला जाणार आहे.

 मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचा  २०२२ - २३ वर्षाचा अर्थसंकल्प गुरुवारी (दि. ३) सादर केला जाणार आहे. आगामी निवडणुका आणि कोरोना महामारीचे संकट कायम असताना आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडून स्थायी समितीला सादर केल्या जाणाऱ्या या बजेटबाबत सर्व स्तरावरील मुंबईकरांना उत्सुकता लागून राहिली आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या अर्थसंकल्पात थेटपणे फारशी करवाढ न करता आरोग्य विभागासाठी भरघोस तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. पण पुरवल्या जाणाऱ्या सेवांच्या शुल्कात वाढ करण्याची शिफारस केली जाऊ शकते. गेल्या वर्षी महापालिकेचा अर्थसंकल्प हा ३९ हजार ३८ कोटींचा होता. आता मावळत्या सभागृहाचे हे अखेरचे बजेट असून, त्यामध्ये आगामी वर्षासाठी ७ ते ८ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. पालिकेचे वरळी ते नरिमन पॉईंटपर्यंतचा कोस्टल रोड, मुलुंड गोरेगाव जोड रस्ता, समुद्राचे पाणी गोडे करणार असे महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहेत. यापैकी कोस्टल रोडचे काम सध्या सुरू आहे, तर समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पासह मुलुंड, गोरेगाव जोडरस्त्यातील भुयारी मार्गाचे कामही पुढल्या आर्थिक वर्षात सुरु होण्याची शक्यता आहे. 

रस्ते दुरुस्तीच्या कामांना मंजुरी- काही दिवसांपूर्वीच रस्ते दुरुस्तीच्या दोन हजार कोटीहून अधिक कामांना मंजुरी देण्यात आली आहे. - त्याच्यासाठीही अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल. कोविड काळातील अनुभवानंतर आरोग्य विभागासाठी आगामी अर्थसंकल्पात भरघोस तरतूद केली जाणार आहे. - यात मुलुंड येथील अगरवाल, विक्रोळी येथील महात्मा फुले रुग्णालय, गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयाच्या विस्तारावर प्रामुख्याने भर दिला जाणार आहे. तसेच प्रसुतिगृहांसाठीही विशेष तरतूद केली जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिका