मालमत्ता करवसुलीत कोट्यवधींचा फटका; मनपाचे साडेचार हजार कोटींचे लक्ष्य अपूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 09:55 AM2024-04-01T09:55:10+5:302024-04-01T09:56:48+5:30
वर्षअखेर आजवरची सर्वात कमी वसुली.
मुंबई : महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाकडे ३१ मार्च सायंकाळी ६ वाजेपर्यंत ३ हजार १२२ कोटी रुपयांचा मालमत्ता कर जमा झाला. वर्षाअखेर जास्तीत जास्त कर गोळा करता यावा यासाठी मालमत्ता कर भरण्यासाठी सोयी-सुविधा केंद्रांवर मध्यरात्री १२ पर्यंत सुरू ठेवण्यात आले. त्यामुळे कर संकलनात आणखी काही कोटींची वाढ होण्याची अपेक्षा होती. मात्र, वर्षाअखेर साडेचार हजार कोटींच्या मालमत्ता कर वसुलीचे लक्ष्य पालिकेला पूर्ण करता आले नाही.
वर्ष सुधारित अंदाज प्रत्यक्ष वसुली (कोटींमध्ये)
२०१६-१७ ४९५६.१८ ४२४६.०१
२०१७-१८ ४९५८.२३ ४५०३.३३
२०१८-१९ ४७७७.३२ ४४९२.९३
२०१९-२० ५०१६.२० ३७३५.०५
२०२०-२१ ४५००,०० ४५८२.९२
२०२१-२२ ४८००.०० ५२०७.९९
२०२२-२३ ४८००.०० ४९९४.१५
२०२३-२४ ४५००.०० ३१२२
मुंबई पालिकेने मालमत्ता कर वसुलीसाठी मागील काही दिवसांपासून कंबर कसली आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी साडेचार हजार कोटी रुपये कर वसुलीचे लक्ष्य पालिकेने ठेवले आहे. चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ अंतर्गत रविवार, ३१ मार्चपर्यंत कर भरण्याची शेवटची मुदत असते. पालिकेने फेब्रुवारीत देयके पाठवल्याने २५ मेपर्यंत कर भरण्याची शेवटची मुदत असणार आहे. नियोजन शून्य कारभारामुळे आणि मालमत्ता कर देयकाच्या विलंबामुळे मुंबई महानगरपालिकेवर टीका होत आहे.
जवळपास १६ लाख मालमत्ताधारकांना फायदा-
२०२२-२३ या गेल्या आर्थिक वर्षात ७,००० कोटींचे उत्पन्न मालमत्ता करात ग्राह्य धरण्यात आले होते. कररचनेत सुधारणा न झाल्यामुळे अखेर उद्दिष्ट्य ४,८०० कोटी सुधारित करण्यात आले होते. गेल्या वर्षी ३१ मार्च २०२३ पर्यंत ४९९४.१५ कोटींची वसुली झाली होती. १ जानेवारी २०२२ पासून मुंबईत ५०० चौरस फुटापर्यंतच्या निवासी सदनिकांना संपूर्ण करमाफी दिल्यामुळे जवळपास १६ लाख मालमत्ताधारकांना त्याचा लाभ झाला.