जंक्शनच्या ठिकाणी रस्त्यांचे सपाटीकरण करा; पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 10:13 AM2024-05-06T10:13:19+5:302024-05-06T10:14:20+5:30
काँक्रिटीकरणाच्या कामाच्या ठिकाणी २७ मे नंतर कोणतेही नवीन खोदकाम करू नये, अशा स्पष्ट सूचना महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.
मुंबई : पालिका हद्दीतील सर्व काँक्रीट रस्त्यांच्या कामांमध्ये जंक्शनच्या ठिकाणी एक समान डांबरी थराने सपाटीकरणाचे काम ३१ मे पूर्वी पूर्ण करावे. जेणेकरून नागरिकांना खड्ड्यांच्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. अपूर्ण असलेल्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या ठिकाणी पावसाळ्यात गैरसोय होऊ नये, यासाठी उपाययोजना कराव्यात. तसेच काँक्रिटीकरणाच्या कामाच्या ठिकाणी २७ मे नंतर कोणतेही नवीन खोदकाम करू नये, अशा स्पष्ट सूचना महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.
खार, अंधेरी, गोरेगाव, आदी ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांची पाहणी आयुक्तांनी शनिवारी रात्री केली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. यावेळी प्रकल्प विभागाचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर, रस्ते व वाहतूक विभागाचे प्रमुख अभियंता मनीषकुमार पटेल उपस्थित होते.
आयुक्तांनी खार पश्चिमेतील १६ वा रस्ता येथे सुरू असलेल्या ड्राय लीन काँक्रीटच्या कामाचीही पाहणी केली. पर्जन्य जलवाहिन्यातून पाण्याचा निचरा वेगाने होईल, यादृष्टीने कामे करण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या.
बॅरिकेड्स काढून टाका-
१) रस्त्यांच्या काँक्रिटीकरण कामाच्या ठिकाणी लावलेले आणि वाहतुकीला अडथळा ठरणारे बॅरिकेड्स पावसाळ्यात शक्य तिथे काढून टाकावेत, अशा सूचनाही आयुक्तांनी केली. रस्त्यांच्या कामामुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही, यासाठी उपाययोजना कराव्यात. खोदलेल्या रस्त्यामुळे दुर्घटना होणार नाही, या दृष्टीने काळजी घेण्याच्या सूचना बांगर यांनी दिल्या.
२) जुहू-वेसावे जोड रस्त्यावर अंधेरी (पश्चिम) येथे राजीव गांधी महाविद्यालयानजीक मार्गिका आखणीच्या कामाचीही पाहणी करण्यात आली. इमारतीच्या प्रवेशाच्या ठिकाणी तयार केलेले रॅम्प काँक्रीटच्या रस्त्याला चांगल्या पद्धतीने जोडण्याचे काम केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.