Join us

‘गोखले’च्या ‘या’ कामांकडे पालिकेचा कानाडोळा; आयुक्तांकडे नागरिकांच्या तक्रारी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 9:50 AM

गोखले आणि बर्फीवाला पुलाच्या जोडणीत पालिकेकडून झालेल्या गोंधळाच्या चौकशीचे संकेत पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत.

मुंबई : गोखले आणि बर्फीवाला पुलाच्या जोडणीत पालिकेकडून झालेल्या गोंधळाच्या चौकशीचे संकेत पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. मात्र, हा गोंधळ केवळ पुलाच्या जोडणीपुरता असला तरी पुलाच्या पुनर्बांधकामामध्ये इतरही अनेक बाबींची अद्याप पूर्तता झाली नसल्याची टीका काही सामाजिक संस्था आणि स्थानिक रहिवाशांनी केली आहे. 

पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना स्थानिकांनी पत्र लिहून त्यांनी गोखले पुलाचा पदपथ, गोखले पूल ते तेली गल्लीपर्यंतचा मार्ग, अंधेरी पूर्वेचा स्कायवॉक अशा अनेक मुद्यांवर काम करण्याची गरज व्यक्त केली आहे. व्हीजेटीआय आणि बर्फीवाला जंक्शनवर उपयोगिता सेवा कशा आणि कुठे असणार याचा कोणताही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे त्याची तपशीलवार माहिती पालिकेने स्थानिकांना द्यावी, अशी मागणी झोरू बाथेना यांनी आयुक्तांकडे केली आहे. 

याशिवाय गोखले रेल्वे पुलावर बांधलेल्या पदपथावर एकाच वेळी २ माणसे चालणेही अशक्य होते, इतका तो अरुंद असल्याचेही पत्रात नमूद आहे. गोखले पुलाच्या पश्चिमेला पादचाऱ्यांसाठी सरकत्या जिन्याची सोय पालिकेकडून करण्यात येणार होती. मात्र, अद्याप त्याच्या बांधणीला सुरुवातच नसल्याचे बाथेना यांनी नमूद केले आहे. 

दुसऱ्या गर्डरचे काम कधी?

गोखले पुलाच्या एका मार्गिकेचे काम पूर्ण झाले असले तरी अद्याप दुसऱ्या मार्गासाठी आवश्यक गर्डरचे काम सुरू झालेले नाही, त्यामुळे स्थानिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. पुलाची देखरेख व कामाच्या नियंत्रणासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची लवकरात लवकर नियुक्ती करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

टॅग्स :मुंबईनगर पालिकाअंधेरी