मुंबई : मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मंगळवारी गुढीपाडव्याच्या दिवशी नागरी कामांच्या पाहणी दौऱ्याचा धडाका लावला. या दौऱ्यात त्यांनी पाणी साचणारे सखल भाग, जलशुद्धीकरण प्रकल्प, नालेसफाईची पाहणी, पवई तलावाला भेट, वॉर्ड ऑफिसला अचानक भेट देत तेथील कामांचा आढावा घेतला.
पालिकेचा पदभार स्वीकारल्यानंतर गगराणी यांनी सर्वप्रथम रेसकोर्सला भेट दिली होती. त्यानंतर दुसऱ्या दौऱ्यात त्यांनी नागरी कामांच्या पाहणीवर भर दिला. या दौऱ्याच्या सुरुवातीला त्यांनी चेंबूरच्या पोस्टल कॉलनी येथील सखल भागात साचणाऱ्या पावसाळी पाण्याचा निचरा करणाऱ्या यंत्रणेचा आढावा घेतला. त्यानंतर वांद्रे-कुर्ला संकुल, तसेच कल्पना सिनेमा परिसरात विमानतळाच्या जागेजवळ मिठी नदीतून गाळ उपसा होत असलेल्या कामांची पाहणी केली.
यावेळी त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर, सहआयुक्त चंद्रशेखर चौरे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
गगराणी यांनी भांडुप जलशुद्धीकरण संकुलास भेट देऊन संकुलाची रचना आणि जलशुद्धीकरण प्रक्रिया, याची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी पवई तलाव व परिसराची पाहणी करून पर्यावरण संवर्धन उपाययोजनांची सद्य:स्थिती जाणून घेतली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातही फेरफटका मारला. मिठी नदीसह पूर्व उपनगरांतील विविध नाल्यांच्या पावसाळापूर्व कामांची पाहणी करून मे अखेर गाळ काढण्याची कामे पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले.
मिठी नदीतून ५४.५७ टक्के गाळ उपसला-
मिठी नदीतून चालू वर्षात दोन लाख १६ हजार १७४ टन इतका गाळ काढण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत एक लाख १७ हजार ९७० मेट्रिक टन (५४.५७ टक्के) इतका गाळ काढण्यात आला आहे. उर्वरित गाळ ३१ एप्रिलपर्यंत काढण्यात येईल.
नाल्यांतून गाळ काढण्याच्या कामांना वेग-
आयुक्तांनी ‘एन’ विभागात लक्ष्मीबाग नाला, ‘एस’ विभागातील एपीआय नाला, वीर सावरकर मार्गावरील उषानगर नाला, गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता जंक्शनवर भांडूपनजीक बॉम्बे ऑक्सिजन नाला येथे भेट देत नाल्यातून गाळ उपसा करण्याच्या कामांची पाहणी केली. ठिकठिकाणी नाल्यांमधून गाळ उपसण्यासोबत सुरू असलेली संरक्षक भिंत बांधकाम, नाल्याकाठचे अतिक्रमण निर्मूलन, भांडुप आणि नाहूरदरम्यान रेल्वे रूळाखाली सुरू असलेले कल्वर्ट बांधकाम आदींचीदेखील त्यांनी माहिती जाणून घेत योग्य ते निर्देश दिले.