"मोफत शो दिला नाही, तर नोटीस बजावू! आयुक्तांच्या नातेवाईकांचा सोनू निगमवर दबाव"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 09:29 AM2022-03-26T09:29:53+5:302022-03-26T10:59:39+5:30
सोनू निगम यांनी मोफत शो दिला नाही, तर त्यांना महापालिकेची नोटीस बजावली जाईल, अशी धमकी राजिंदर सिंह देत आहेत. याप्रकरणी राज्य सरकारने चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी साटम यांनी केली.
मुंबई : मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांचे नातेवाइक राजिंदर सिंह हे आपल्याला धमक्या देत असल्याची सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांची तक्रार असल्याचे भाजपचे आमदार अमित साटम यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले. औचित्याच्या मुद्दयाद्वारे हा विषय मांडताना त्यांनी सांगितले की, सोनू निगम यांनी मोफत शो दिला नाही, तर त्यांना महापालिकेची नोटीस बजावली जाईल, अशी धमकी राजिंदर सिंह देत आहेत. याप्रकरणी राज्य सरकारने चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी साटम यांनी केली.
बंगल्यांना किल्ल्याचे नाव, आता ते दत्तक घ्या
मुंबईतील मंत्र्यांच्या बंगल्यांना राज्यातील विविध किल्ल्यांची नावे देण्यात आली आहेत. ज्या किल्ल्याचे नाव ज्या बंगल्याला आहे त्या बंगल्यात राहणाऱ्या मंत्र्यांनी तो किल्ला दत्तक घ्यावा, अशी सूचना भाजपच्या माधुरी मिसाळ यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली. मनोरा आमदार निवास पाडून साडेचार वर्षे झाली. मनोरा आमदार निवास कधीपर्यंत बांधून पूर्ण करणार, अशी विचारणा भाजपचे समीर कुणावार यांनी केली.
‘काश्मीर फाईल्स’च्या शोमध्ये भगव्या स्कार्फना मनाई
नाशिक येथे ‘द काश्मीर फाईल्स’ हा सिनेमा बघण्यासाठी गेलेल्या महिलांना पीव्हीआर सिनेमागृहाच्या सुरक्षारक्षकाने अडवून स्कार्फ घालून जाण्यास मनाई केली. याप्रकरणी चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी भाजपच्या देवयानी फरांदे यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली.
पीव्हीआरच्या मालकांना विचारणा केली असता, त्यांना तसा वरून आदेश असल्याचे सांगितले. असे असेल, तर मग मनाई आदेश कोणी दिला होता, असा सवाल फरांदे यांनी केला. ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी ही मागणी उचलून धरली. त्यावर, संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी चौकशी करून कारवाई करण्यास गृहमंत्र्यांना सांगितले जाईल, असे सांगितले.