मुंबई : मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) हे राज्यातील ठाकरे सरकारचे 'ब्लु आइड बॉय' आहेत, असे म्हणज आज भाजप नेते मोहित कंबोज भारतीय यांनी आयुक्त चलह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या ३ तारखेला आयकर विभागाने चहल यांना नोटीस बजावली आहे. राज्याच्या इतिहासात एका वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याला सेवेत असताना आयकर विभागाने नोटीस बजावली, असे पहिल्यांदाच झाले आहे. एवढेच नाही, तर तपास फक्त नेत्यांचाच का होतो? अधिकाऱ्यांचा का होत नाही? असा माझा आयकर विभागाला सवाल आहे, असेही मोहित कंबोज भारतीय यावेळी म्हणाले.
महानगर पालिका आयुक्त आणि स्थायी समितीचे अध्यक्ष शिवसेना नेते यशवंत जाधव यांनी हातमिळवणी केली आहे. यामुळेच मुंबई महानगरपालिकेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप करत, अयुक्तांशिवाय एवढा मोठा भ्रष्टाचार होऊच शकत नाही, असेही मोहित कंबोज भारतीय म्हणाले.
समित ठक्कर यानी 4 मार्चला, चहल यांना नोटीस आल्याचे ट्विट केले. यानंतर, चहल घाबरले आणि त्यानी समित ठक्कर यांच्या विरोधात तक्रार केली. मानहानीचा दावा केला. चहल तुम्हाला भीती का वाटते? तुम्ही का जात नाही आयकरच्या कार्यालयात. यामध्ये काही तरी नक्की गडबड आहे. ज्या पद्धतीने माईक बंद करून टेंडर दिले गेले, त्याच्या तपासापासून चहल का पळ काढत आहेत? असा सवालही मोहित यांनी यावेळी केला.
मोहित म्हणाले, आता अमित साटम यांचे भ्रष्ट्र म्युनिसिपल कमिशनर, असे पुस्तक येत आहे. यशवंत जाधव यांच्या सोबत असलेल्या कमिशनरची चौकशी व्हावी. मुंबई पालिका आयुक्तांचा यामध्ये किती सहभाग आहे, असा प्रश्न मुंबईकराना पडला आहे. यांनी अमेरिकेत संपत्ती बनवली आहे. याची संपूर्ण तक्रार आम्ही करणार आहोत. मंगल प्रभात लोढा हेदेखील याबाबत संजय पांडे यांची भेट घेणार आहेत. काही युट्युब चॅनल म्हणत आहेत की, पांडे आलेत त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी आता सावधान व्हावे. अशा पद्धतीने नरेटिव्ही सेट करत, भाजप नेते घाबरतील असे पसरवले जात आहे. पण आम्ही कुणाला घाबरत नाही.
बेकायदेशीर पद्धतीने मशिदीवर लावण्यात आलेले लाऊडस्पीकर हटवण्यात यावेत -मुंबई पोलीस आयुक्त झाल्यानंतर संजय पांडे यांनी चांगली कामे सध्या सुरू केली आहे. अजाण स्पीकरवर होणे, हे कुठल्या नियमात नाही. संजय पांडे हे चांगले काम करत आहेत त्यांनी याकडेही लक्ष द्यावे. बेकायदेशीर पद्धतीने मशिदीवर लावण्यात आलेले लाऊडस्पीकर हटवण्यात यावेत, अशी आम्ही त्याच्याकडे मागणी करतोय. अलाहाबाद कोर्टानेही याबाबद निर्णय दिलेला होता. यामुळे हार्ट पेशंट आणि इतर आजार असणाऱ्या रुग्णांनाही त्रास होतो तो होणार नाही. यासंदर्भात आम्ही मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वात हे निवेदन पोलीस आयुक्तांना देण्यात येणार आहे. वांद्रे, वर्सोवा, मोहम्मद अली रोड येथे ही मोहीम राबवायला हवी, असेही मोहित यावेळी म्हणाले.