मुंबई : मान्सूनपूर्व कामांची डेडलाइन संपण्यास अवघे २० दिवस उरले असताना मुंबईत केवळ ३१ टक्के नालेसफाई पूर्ण झाली आहे. मुंबईला पूरमुक्त ठेवण्यासाठी मिठी नदीची सफाई महत्त्वाची ठरते. आतापर्यंत नदीच्या पात्रातील केवळ ३० टक्के गाळ काढण्यात आला आहे. या सर्व कामांची झाडाझडती आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी सोमवारी घेतली. जादा मनुष्यबळ व यंत्र, तसेच दोन शिफ्टमध्ये काम करून पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करून घेण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने सुरू असल्याने त्याचा परिणाम पावसाळापूर्व कामांवर झाला आहे. मात्र पावसाळा सुरू होण्यास अवघा महिना उरला असल्याने नालेसफाई, रस्ते दुरुस्ती ही कामे आता सुरू करण्यात आली आहेत. शहर, पूर्व उपनगरे व पश्चिम उपनगरे अशा तिन्ही भागांतून सुमारे २१,५०५ कि.मी. लांबीचा मिठी नदीचा प्रवाह आहे. पावसाळ्यात मिठी नदीच्या पात्राने धोक्याची पातळी ओलांडल्यास मुंबईत पाणी भरते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी या नदीमधील ७० टक्के गाळ काढणे आवश्यक आहे. नियमानुसार ३१ मेपर्यंत ही कामे पूर्ण करणे अपेक्षित आहे. मात्र आतापर्यंत केवळ ३० टक्के गाळ काढण्यात आला आहे. त्यामुळे पालिका आयुक्त चहल यांनी मिठी नदीतील सफाईच्या कामाची सोमवारी पाहणी केली.गाळ काढण्याच्या कामाची पाहणी करताना माहीम कॉजवे येथील मिठी नदीचे पातमुख, वांद्रे-कुर्ला संकुलात अमेरिकन स्कूलमागे आणि बीकेसी पूर्व-पश्चिम जोडणारा उड्डाणपूल येथे त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन कामाचा आढावा घेतला. पावसाळ्यापूर्वी गाळ काढण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आवश्यकता भासल्यास अतिरिक्त यंंत्रसामग्री व मनुष्यबळ तैनात करून दोन सत्रांमध्ये (शिफ्ट) काम करण्याचे निर्देशही आयुक्तांनी यावेळी दिले.३० टक्के गाळ काढण्याचे काम पूर्णच्मिठी नदीमधून सुमारे एक लाख ३८ हजार ८३० मेट्रिक टन गाळ उपसण्याचे लक्ष्य असते. यापैकी ७० टक्के म्हणजे ९८ हजार ५०० मेट्रिक टन गाळ हा पावसाळ्यापूर्वी काढला जातो.च्आतापर्यंत २६ हजार ११८ मेट्रिक टन म्हणजेच सुमारे ३० टक्के गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले आहे.च्मुंबईतील एकूण २६३.९१ कि.मी. लांबीच्या २८० नाल्यांमधून पावसाळ्याआधी २,५३,३४४ मेट्रिक टन गाळ काढणे आवश्यक आहे.च्यापैकी ७९,६४४.०१ मेट्रिक टन म्हणजेच ३१.४३ टक्के गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले आहे.
मिठी नदीच्या कामाची आयुक्तांनी घेतली झाडाझडती; दोन शिफ्टमध्ये काम करा, पावसाळ्यात मुंबईकरांना त्रास नको
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 3:41 AM