२८ बड्या बांधकामांना आयुक्तांनी दिला काम थांबविण्याचा इशारा

By सीमा महांगडे | Updated: December 27, 2024 06:51 IST2024-12-27T06:50:37+5:302024-12-27T06:51:11+5:30

महापालिकेचे नियम पाळा, नाही तर कठाेर कारवाई अटळ

BMC Commissioner warns 28 major construction projects to stop work | २८ बड्या बांधकामांना आयुक्तांनी दिला काम थांबविण्याचा इशारा

२८ बड्या बांधकामांना आयुक्तांनी दिला काम थांबविण्याचा इशारा

मुंबई : वायुप्रदूषण नियंत्रणाबाबतच्या महापालिकेच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी केली जाते की नाही, याची पाहणी पालिकेच्या प्रदूषण नियंत्रक पथकांनी केली. बुधवारपर्यंत सर्व वॉर्डांतील मिळून ८६८ बांधकामांच्या साईट्सना पथकांनी भेट देऊन नियमांचे पालन न करणाऱ्या २८ बांधकामांना कारवाईचा लेखी इशारा देण्यात आला. 
 
पालिका पथकांनी ठपका ठेवलेल्या २८ बांधकामांनी प्रदूषण नियंत्रणाबाबतचे नियम धुडकावल्यास काम थांबविण्याची नोटीस जारी करण्याबरोबरच कामाचे ठिकाण सीलबंद करण्यासारख्या कठोर कारवाईचा सज्जड इशाराही संबंधित विकासकांना देण्यात आला आहे. 
   
वातावरणातील बदलामुळे मुंबईतील हवेच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे धूळ, धूर नियंत्रणासाठी पालिकेच्या सर्व २४ वॉर्डांत युद्धपातळीवर उपाययोजना करण्यात येत आहेत. पालिकेच्या नियमांचे पालन होतेय की नाही हे पडताळण्यासाठी २४ वॉर्डांत पथके नेमण्यात आली आहेत. ही पथके वॉर्डातील विकासकामे, बांधकामांच्या ठिकाणाची पाहणी करीत आहेत. तसेच कामाच्या ठिकाणी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याच्या लेखी सूचनाही देत आहेत.

‘ऑटो डीसीआर’ प्रणालीद्वारेही सूचना  

शहर आणि उपनगरातील २८ बांधकामांना इशारा दिल्यानंतर उर्वरित बांधकाम प्रकल्पस्थळांनाही भेटी देण्याचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. तसेच, महानगरपालिकेचे संबंधित इतर विभागही ‘ऑटो डीसीआर’सारख्या ऑनलाइन प्रणालीतून बांधकाम प्रकल्पांना सूचना दिल्या जात आहेत. 

हवेचा गुणवत्ता निर्देशांक म्हणजे काय? 

हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) पर्यावरणाच्या संदर्भात दररोजच्या हवेच्या गुणवत्तेची नोंद करण्यासाठी वापरले जाणारे एक संख्यात्मक प्रमाण आहे. या निर्देशांकावरून वायू प्रदूषणाच्या पातळीचा शाेध घेतला जातो.

एक्यूआयची श्रेणी आणि त्याचा अर्थ 

० ते ५० (चांगले) : या स्तरावर हवेची गुणवत्ता चांगली मानली जाते. वायू प्रदूषणास कोणताही धोका नसतो.

५१ ते १०० (मध्यम) : याचा अर्थ स्वीकार्य वायु गुणवत्ता.  हे प्रमाण काही लोकांसाठी मर्यादीत चिंता निर्माण करते.

१०१ ते १५० (आरोग्यास हानिकारक) : यामुळे आरोग्यावर परिणाम हाेत नसला तरी ओझोनच्या जोखमीमुळे मुले, वृद्ध, फुफ्फुसांचा आजार असलेल्यांना जास्त धोका असतो.

१५१ ते २०० (वाईट) : या श्रेणीमध्ये, प्रत्येकाच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम तर संवेदनशील लाेकांना अधिक गंभीर परिणाम हाेऊ शकताे.

२०१ ते ३०० (अतिशय वाईट) : आरोग्यासाठी आणीबाणीच्या परिस्थितीचा इशारा. प्रत्येकाच्या आराेग्यावर गंभीर परिणामांची शक्यता.

मुंबईत सध्या कमाल २६ ते ३० तर किमान १८ ते २१ अंश सेल्सिअस तापमान असून सरासरीपेक्षा ते खालावलेले आहे. हवेत गारवा आणि अरबी समुद्र व हिंद महासागरातून येणारी आर्द्रता, शहरातील बांधकामे, वाहनांच्या प्रदूषणामुळे दिवसभर धुके, धूर आणि धूळ वाढली आहे. हवेचा उच्चदाब असल्याने तिघांच्या एकत्रित परिणामातून धूरयुक्त धुक्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मुंबईत धुरक्याचे मळभ दाटले आहे.
    - माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ

सर्व संबंधित घटक आणि यंत्रणांसाठीही मार्गदर्शक तत्त्वे अनिवार्य आहेत. महापालिकेच्या मार्गदर्शक तत्त्वांची तातडीने आणि दिलेल्या वेळेत अंमलबजावणी करावी; अन्यथा बांधकाम थांबविण्याची नोटीस जारी करणे किंवा कामाचे ठिकाण सील करणे यासारखी कठोर कारवाई करण्यात येईल - भूषण गगराणी, आयुक्त, मुंबई महानगरपालिका
 

Web Title: BMC Commissioner warns 28 major construction projects to stop work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.