‘मिठी’ला आयुक्तांची सरप्राईज व्हिजिट; गाळ काढण्याच्या कामाचा आढावा 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 11:02 AM2024-05-24T11:02:06+5:302024-05-24T11:07:09+5:30

मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी गुरुवारी अचानक वाकोला नदी आणि मिठी नदीला भेट देऊन गाळ उपशाच्या कामाची पाहणी केली.

bmc commissioner's surprise visit to mithi river getting review of desilting work in mumbai  | ‘मिठी’ला आयुक्तांची सरप्राईज व्हिजिट; गाळ काढण्याच्या कामाचा आढावा 

‘मिठी’ला आयुक्तांची सरप्राईज व्हिजिट; गाळ काढण्याच्या कामाचा आढावा 

मुंबई : मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी गुरुवारी अचानक वाकोला नदी आणि मिठी नदीला भेट देऊन गाळ उपशाच्या कामाची पाहणी केली. दोन दिवसांपूर्वी आढावा बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार कामांना वेग देण्यात आला आहे का, याचा आढावा त्यांनी यावेळी घेतला.

वांद्रे-कुर्ला संकुल येथे वाकोला नदीवरील पुलावरून वाकोला नदीतील गाळ काढण्याच्या कामाची पाहणी गगराणी यांनी केली. पन्टून संयंत्रावर स्थित पोकलेन लाँग ब्रूम संयंत्राद्वारे तेथे काम सुरू होते. वरच्या दिशेला असलेल्या भारतनगर वसाहतीच्या बाजूने येणारा तरंगता कचरा व गाळ सातत्याने काढला जात असल्याची माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली. 

१) त्याचबरोबर मिठी नदी जंक्शन येथून मिठी नदीतील गाळ उपसा आणि नदी रुंदीकरण, संरक्षक भिंत बांधणी आदी कामांची आयुक्तांनी पाहणी केली. 

२) या ठिकाणी उत्तर बाजूस पालिकेच्या ‘एच पूर्व’ विभागाची हद्द आहे, तर दक्षिण बाजूस ‘एल’ विभागाची हद्द आहे. दक्षिण बाजूकडील नदीचे रुंदीकरण हे तेथील बांधकामांविषयीचा प्रश्न न्यायप्रविष्ट असल्याने प्रलंबित असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

३) त्यावर न्यायालयाकडून याविषयी आदेश प्राप्त करून ही बांधकामे पाडून टाकावीत तसेच  पात्र-अपात्रता तपासून पुनर्वसनाची कार्यवाही करावी, असे आदेश त्यांनी दिले.

अतिरिक्त आयुक्तांकडूनही पाहणी-

१) पालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनीही पश्चिम उपनगरांमध्ये ठिकठिकाणी भेटी देऊन गाळ उपसा कामांची पाहणी केली. 

२) वांद्रे पश्चिम येथील एसएनडीटी नाला, अंधेरी पश्चिम येथील रसराज नाला, अंधेरी भुयारी मार्ग, गोरेगाव पश्चिममधील वालभट नदी, मालाड भुयारी मार्ग, कांदिवली येथे पोईसर नदी, बोरीवली पूर्व येथे रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे कल्वर्ट, दहिसर येथे पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ एस. एन. दुबे रस्त्यावर एमएमआरडीएमार्फत मेट्रो प्रकल्प अंतर्गत पर्जन्य जलवाहिनीच्या  सुरू असलेल्या कामांची त्यांनी पाहणी केली.

जुन्या भिंती पावसाळ्यानंतर दुरुस्त करा-

नाल्यांशेजारी असलेल्या जुन्या भिंती पावसाळ्यानंतर दुरुस्त कराव्यात, जोरदार पावसाप्रसंगी भुयारी मार्गांच्या ठिकाणी पाणी पातळी वाढल्यास वाहतूक पोलिसांशी समन्वय ठेवून वाहतुकीचे योग्य नियोजन करावे, रेल्वे प्रशासनाच्या हद्दीतील कल्वर्ट रेल्वेच्या यंत्रणेकडून योग्य रीतीने स्वच्छ करून घ्यावेत, असे निर्देश डॉ. शिंदे यांनी दिले. मेट्रो ९ अंतर्गत दहिसरमध्ये एस.एन. दुबे मार्गावर एमएमआरडीएमार्फत सुरू असलेले पर्जन्य जलवाहिनीचे काम चार दिवसांत पूर्ण करण्याची सूचनादेखील त्यांनी एमएमआरडीए प्रशासनाला केली.

Web Title: bmc commissioner's surprise visit to mithi river getting review of desilting work in mumbai 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.