मुंबई : मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामात निष्काळजीपणा करणाऱ्या कंत्राटदारांना पालिकेने दणका दिला आहे. सव्वा महिन्यात ३१ ठिकाणी झालेल्या कामात त्रुटी राहिल्याने संबंधित कंत्राटदारांना ३० लाख ८३ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
मुंबईतील लहान व मोठ्या नाल्यांमधून गाळ काढण्याचे काम पालिकेकडून सुरू आहे. यंदा पावसाळ्यापूर्वी एकूण १० लाख २१ हजार ७८२ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असून, त्यापैकी आतापर्यंत ६ लाख २३ हजार ६३१ मेट्रिक टन म्हणजे निर्धारित उद्दिष्टाच्या ६१.०३ टक्के गाळ काढण्यात आला. दरम्यान, या कामांवर प्रभावी देखरेख ठेवण्याच्या सूचना पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी यंत्रणेला दिल्या आहेत. अनेकदा कंत्राटदारांकडून नालेसफाई करून गाळाच्या बाबतीत निष्काळजीपणा दाखवला जात असल्याने अशा कंत्राटदारांवर पालिकेने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.
देय रकमेतून दंडाची वसुली-
१) पालिकेतर्फे नालेसफाईला सुरुवात झाली असली तरी नाल्यातून काढलेला गाळ नाल्याच्या कडेला तसेच रस्त्यावर टाकण्यात येत आहे. हा गाळा पुन्हा नाल्यात जाण्याची शक्यता असते.
२) दुसरीकडे पादचाऱ्यांनाही अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरातील मोठ्या नाल्यांतून गाळ काढण्याच्या कामाची पाहणी व तपासणीदरम्यान २९ एप्रिलपर्यंत ३१ ठिकाणी कंत्राटदारांना दंड ठोठाविण्यात आला आहे.
३) कंत्राटदारांच्या देय रकमेतून दंडाची रक्कम कापून घेण्यात येणार आहे. गोवंडीतील डम्पिंग नाल्यातील गाळ काढण्याच्या कामास सुरुवात न केल्याने कंत्राटदार डी. बी. इन्फ्रास्ट्रक्चर यांना एक लाख रुपयांचा दंड लावण्यात आला आहे.