जम्बो कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबई सत्र न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज आज कोर्टानं फेटाळून लावला आहे. सत्र न्यायाधीश एस. बी. जोशी यांनी अर्जावर सुनावणी केली. त्यांनी किशोरी पेडणेकर यांच्यासह याप्रकरणातील ठेकेदार वेदांता कंपनीचे संचालक, ठेकेदार सतीश कन्हय्यालाल यांचाही जामीन अर्ज फेटाळला आहे.
जम्बो कोविड सेंटर घोटाळ्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांच्यावर आहे. पण या प्रकरणात आपल्याला नाहक गोवले असून, आपण निर्दोष असल्याचा दावा करीत किशोरी पेडणेकर यांनी ॲड. राहुल अरोटे यांच्यामार्फत सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. पण कोर्टानं अर्ज फेटाळून लावल्यामुळे पेडणेकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. यानंतर आता इओडब्ल्यू किशोरी पेडणेकर यांना चौकशीसाठी समन्स बजावू शकतं, तसंच चौकशीमध्ये दिलेल्या उत्तरांमधून इओडब्ल्यूचं समाधान झालं नाही, तर पुढची कारवाईही होऊ शकते.