मुंबई - रेल्वे प्रशासनाने मुंबई महापालिकेचं तब्बल 233 कोटी 90 लाख 92 हजार 962 रुपयांचं पाण्याचं बिल थकवलं आहे. याप्रकरणी मध्य आणि पश्चिम रेल्वेला पालिकेने डिफॉल्टर यादीत टाकले आहे. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी महापालिकेकडून पाण्याच्या थकबाकीदारांची माहिती मागवली होती. त्यातून ही आकडेवारी समोर आली.शेख यांनी आरटीआय अंतर्गत केलेल्या अर्जाला जन माहिती अधिकरी तथा कार्यकारी अभियंता जलमापके (महसूल) यांनी उत्तर दिलं. यानुसार मध्य आणि पश्चिम रेल्वेकडे तब्बल 233 कोटी 90 लाख 92 हजार 962 रुपयांची थकबाकी आहे. तसेच मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या एकूण 122 जलजोडण्यांना डिफॉल्टर यादीत टाकण्यात आले आहे. यामध्ये मध्य रेल्वेच्या 67 जलजोडण्यांचा समावेश आहे. तसेच पश्चिम रेल्वेच्या 55 जलजोडण्यांचा समावेश आहे. मध्य रेल्वेनं पाण्याचं तब्बल 103 कोटी 18 लाख 56 हजार 124 रुपयांचं बिल थकवलं आहे. तर पश्चिम रेल्वेच्या थकीत बिलाची रक्कम तब्बल 130 कोटी 72 लाख 36 हजार 838 रुपये इतकी आहे. यापूर्वी मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय आवासावर पाण्याच्या एकूण 8 कोटींची थकबाकी होती. पालिकेनं मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याला डिफॉल्टर यादीतदेखील टाकलं होतं. याबद्दलची बातमी प्रसिद्ध झाल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागानं जवळपास सर्व थकीत रक्कम मनपाकडे भरली.
मध्य, पश्चिम रेल्वे डिफॉल्टर यादीत; पालिकेचं 233 कोटींचं पाणी बिल थकलं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2019 5:11 PM