मुंबई: मालवणी परिसरातील नाल्यालगत नवीन रस्ता बांधण्यात येणार आहे. मात्र या रस्त्याच्या मार्गात येथे उभ्या असलेल्या बांधकामांचा अडथळा निर्माण झाला होता. अखेर तीन टप्प्यांमध्ये येथील १९८ बांधकामे महापालिकेमार्फत जमीनदोस्त करण्यात आली आहेत. यामुळे ६१५ मीटर लांबीचा व ६ मीटर रुंदीचा रस्ता आणि मालवणी नाल्यालगत भिंत बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या रस्त्यामुळे भविष्यात अब्दुल हमीद रस्ता, स्टेशन रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होऊन चार लाख लोकांना दिलासा मिळणार आहे.मुंबईत अनेक ठिकाणी नाले व नदीलगत अनधिकृत बांधकामे आहेत. यामुळे नाले रुंदीकरण व संरक्षण भिंत बांधणे तसेच रस्त्यांचे कामही काही ठिकाणी अडकले आहे. ही अडचण दूर करण्यासाठी महापालिकेने पोलीस संरक्षणात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. दहिसर नदी परिसरातील बेकायदा बांधकामे हटविल्यानंतर महापालिकेच्या पी उत्तर विभागाने आता मालवणी नाल्यालगतच्या झोपड्या हटविल्या आहेत. या कारवाईच्या पहिल्या दोन टप्प्यांमध्ये १३३ बांधकामे हटविण्यात आली होती तर शुक्रवारी तिसऱ्या टप्प्यात ६५ बांधकामे तोडण्यात आली आहेत.यामुळे मालवणी नाल्याचे खोलीकरण करून नाल्याच्या काठी भिंत बाधणे शक्य होणार आहे. परिणामी, येत्या पावसाळ्यात या परिसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक प्रभावीपणे होणार आहे. या कारवाईला स्थानिक रहिवाशांनी विरोध केला. या कारवाईमध्ये सुमारे ७० पोलिसांचा ताफा घटनास्थळी तैनात होता. तर महापालिकेचे ८० कामगार - अधिकारी घटनास्थळी कार्यरत होते.
मालवणीतील रस्त्याने घेतला ‘मोकळा श्वास’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 1:31 AM