मुंबई: दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यावरुन शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात गेल्या काही दिवसापासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या दोन्ही गटाकडून शिवाजी पार्कवर परवानगी मिळावी यासाठी अर्ज करण्यात आले होते, आता या संदर्भात मुंबई महालिकेने निर्णय घेतला आहे. शिवाजी पार्कवर दोन्ही गटांना परवानगी नाकारण्यात आल्याचे पत्र महापालिकेने दिले आहे.
मुंबई महापालिकेने शिंदे गटातील नेते आमदार सदा सरवणकर यांना पत्र दिले आहे.' दोन्ही गटाकडून मेळाव्यासाठी परवानगी मागण्यात आली आहे. पण कोणत्याही एका गटाला ही परवानगी दिली गेल्यास या परिसरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे आम्ही दोन्ही अर्जदारांना परवानगी नाकारत आहोत,असं महापालिकेकडून दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
शिवसेनेने शिवाजी पार्क मैदान परवानगीवरुन मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिवसेनेतील ज्येष्ठनेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. यामुळे आता शिवसेनेत उभी फूट पडली असल्याचे बोलले जात आहे. आता काही महिन्यातच मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमिवर मुंबईतील राजकीय वातावरण तापू लागले आहे.