महापालिकेलाच नको पुनर्रोपण; पुनर्रोपित ३० टक्के झाडे जगलीच नसल्याचे उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 10:23 AM2024-03-23T10:23:26+5:302024-03-23T10:24:57+5:30
पालिकेच्या उद्यान विभागाकडील माहितीनुसार, ३१ ऑगस्ट २०२३ रोजी पालिकेच्या विविध वॉर्डांमध्ये एकूण १४ हजार ३४ झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले.
मुंबई : शहरातील झाडे तोडण्याऐवजी त्यांचे पुनर्रोपण करण्याच्या बाता पालिका प्रशासन वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत मारत असले, तरी हे पुनर्रोपण आता पालिकेलाच नकोसे असल्याचे उघडकीस आले आहे. पालिकेच्या उद्यान विभागाकडील माहितीनुसार, ३१ ऑगस्ट २०२३ रोजी पालिकेच्या विविध वॉर्डांमध्ये एकूण १४ हजार ३४ झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले. त्यातील ३० टक्के म्हणजे चार हजार ४४४ झाडे जगलेली नाहीत. त्यामुळे हे पुनर्रोपण फक्त दिखावा असल्याची टीका पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.
मुंबईतील विविध प्रकल्पांना अडथळा ठरणारी झाडे कापण्याबरोबरच त्यांचे पुनर्रोपण केले जाते. झाडे वाचविण्यासाठी पुनर्रोपणावर भर दिला जात असल्याचा दावा पालिकेकडून आतापर्यंत केला जात होता. मात्र आता तो या आकडेवारीमुळे फोल ठरला आहे. झाडांचे पुनर्रोपण करण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे.
मुळापासून काळजी आवश्यक -
पुनर्रोपित झाड मरू नये म्हणून ते स्थलांतर करताना त्याच्या मुळापासून काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी विविध यंत्रसामग्री वापरणे आवश्यक असून पालिकेने नियुक्त केलेल्या ठेकेदारांकडे अशी यंत्रसामग्री नसल्याची टीका तज्ज्ञांकडून होत आहे.
नियम कागदावरच?
पालिकेकडून ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत एकूण १७ हजार झाडांची कत्तल केली आहे. एक झाड कापल्यास तीन झाडे लावणे बंधनकारक आहे. मात्र नियम आणि कायदे कागदावरच राहत असून झाडांची बेसुमार कत्तल सुरू असल्याची खंत वॉचडॉग फाउंडेशनने व्यक्त केली आहे. पुनर्रोपण केलेली किती झाडे जगतात, याचीही माहिती पालिकेने ठेवणे आवश्यक आहे.
कोणत्या वॉर्डात किती झाडे पुनर्रोपित -
वॉर्ड झाडांची पुनर्रोपित न जगलेली
कत्तल झाडे झाडे
ए ७११ ६३६ ३६१
बी ८३ ७४ ३२
सी २५ १३ ११
डी ४७९ ३८४ ३१९
इ ८८५ ६३६ ४१८
एफ उत्तर १७०३ ९६६ ४१८
एफ दक्षिण १४५० ११३९ ६२९
जी उत्तर ७३० ५०४ ३९०
जी दक्षिण १८४९ १६९१ १३०५
के पश्चिम २०८३ २०६३ -
एल ३७६ ६७१ -
एम पूर्व १५८ १७४ -
एम पश्चिम ११८ १२९ -
एन १९२८ ४२८ -
पी उत्तर १६०७ १२९२ -
पी दक्षिण १६६० १८४४ -
एस १००६ १३०८ -
टी १९९ ४८२ -