“महापालिकेला पडलेला सगळ्यात मोठा खड्डा वांद्र्यात, या निवडणुकीत मुंबईकर आधी तो बुजवतील”
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 03:37 PM2022-07-29T15:37:46+5:302022-07-29T15:38:22+5:30
तो खड्डा बुजवल्याशिवाय मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे पडणे बंद होणार नाही, अशी बोचरी टीका भाजपने केली आहे.
मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोर पक्ष वाचविण्याचे नवे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. राज्यभरातून शिंदे गटाला मोठा पाठिंबा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता मुंबई, ठाणेसह राज्यातील अनेक महापालिकांच्या निवडणुका (bmc election 2022) काहीच दिवसात लागणार आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना असा प्रचंड मोठा सामना रंगताना पाहायला मिळणार आहे. यासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून, भाजपने मुंबईतील खड्ड्यांवरून पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचले आहे.
जोरदार पावसाने रस्त्यांची अक्षरश: चाळण झाल्याने महापालिकेला नागरिकांच्या प्रचंड रोषाला तोंड द्यावे लागत आहे. मुंबई महापालिकेने रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे ठरविले आहे. पालिकेकडून कोल्डमिक्सच्या साह्याने खड्डे बुजविण्याचे काम वेगाने सुरू आहे. त्याआधारे सुमारे १८ हजार खड्डे बुजविण्यात आल्याचे मुंबई पालिकेकडून सांगितले जात आहे. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर अप्रत्यक्षरित्या हल्लाबोल केला आहे.
त्याशिवाय मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे पडणे बंद होणार नाही
अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, महापालिकेला पडलेला सगळ्यात मोठा खड्डा वांद्र्याला आहे. येत्या निवडणुकीत मुंबईकर आधी तो बुजवतील. तो खड्डा बुजवल्याशिवाय मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे पडणे बंद होणार नाही, अशी बोचरी टीका करण्यात आली आहे. यापूर्वीही भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीवरून टीकास्त्र सोडले होते. माझ्या वडिलांचे नाव वापरू नका, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. याला प्रत्युत्तर देताना, पण त्यांचे स्मारक महापौर बंगल्यात, सरकारी म्हणजे जनतेच्या पैशाने करा... ते ५०० कोटी स्वतःच्या खिशातून खर्च करा ना उध्दव जी..., असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले होते.
दरम्यान, मुंबई महापालिकेने खड्डे बुजविण्याच्या कामांची गती वाढवली आहे. त्यातून २५ जुलैपर्यंत सुमारे १८ हजार खड्डे बुजविण्याचा दावा पालिकेने केला असून त्यात कोल्डमिक्स वापराने १५ हजार ५८८ खड्डे बुजविण्यात आले आहेत. त्यासह, कंत्राटदारांमार्फत १,१५४ आणि पालिकेच्या केंद्रीय संस्थेमार्फत १,२६६ इतके खड्डे बुजविण्यात आले आहेत. मुंबई पालिकेमार्फत खड्डे बुजविण्यासाठी कोल्डमिक्सचा वापर केला जात आहे. इतर ठिकाणचे खड्डेही बुजविण्याचे काम सुरू असल्याचे पालिकेमार्फत सांगण्यात आले आहे.